Wednesday, September 9, 2009

फीचर्स >> शिक्षण - करिअर RSS

आधुनिक विज्ञानातील संधी
Tuesday, August 18th, 2009 AT 5:08 PM

संगणक व माहिती-तंत्रज्ञानाचा सर्वच विषयांत अंतर्भाव होऊ लागल्यामुळे विज्ञानाच्या अनेक शाखांमधील अभ्यासाच्या व संशोधनाच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाबरोबर बदलत्या विज्ञान विषयांचा अभ्यास केला तर त्यांना करियरसाठी अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध होतील.

बदलत्या काळानुसार करियरच्या संकल्पनाही बदलत आहेत, तर अनेक विज्ञान विषयातील शाखांचे स्वरूपही बदलत चालले आहे. अनेक विषयांमध्ये नवनवीन शाखा उदयास येत आहेत. त्यानुसार करियरसाठी नवनवीन संधी व वेगवेगळे पर्याय निर्माण होत आहेत. संगणक व माहिती-तंत्रज्ञानाचा सर्वच विषयांत अंतर्भाव होऊ लागल्यामुळे विज्ञानाच्या अनेक शाखांमधील अभ्यासाच्या व संशोधनाच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. विज्ञान विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाबरोबर बदलत्या विज्ञान विषयांचा अभ्यास केला तर त्यांना करियरसाठी अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध होतील. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अपारंपॉरिक ऊर्जा क्षेत्र, केमिइन्फॉर्मेटिक्‍स, हायड्रालॉजी, कार्बन सेक्‍टर, जैवतंत्रज्ञान व जैवमाहिती-तंत्रज्ञान, नॅनोटेक्‍नॉलाजी, पेट्रोइन्फॉर्मेटिक्‍स, जिओइन्फॉर्मेटिक्‍स आदी नवनवीन क्षेत्रांतील करियरचा थोडक्‍यात परिचय करून घेऊ या.



अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रे (नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस) ः

सध्या ऊर्जेची गरज वाढत चालली आहे व त्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होत नाही. ऊर्जेशिवाय कसलाही विकास होत नाही. पारंपरिक पद्धतीने ऊर्जेची निर्मिती केल्यास प्रदूषण व जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग) सारख्या गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ, सरकार अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून ऊर्जा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये सौरऊर्जा, पवन ऊर्जा, भरतीच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा व अणुऊर्जा इ. पर्याय येतात. खनिज तेलाचे साठे कधी ना कधी संपुष्टात येणार आहेत. तेव्हा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचाच काय तो आधार असेल. त्यामुळेच अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून ऊर्जा मिळविणे अधिक सुलभ व किफायतशीर करण्यामागे जगभरचे शास्त्रज्ञ लागले आहेत. हायड्रोजन वायूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी संसोधन सुरू आहे. यासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागणार आहे. म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत व नजीकच्या भविष्यात या क्षेत्रातील संधी वाढतच जाणार आहेत. सध्याचे यांत्रिक जग ऊर्जेशिवाय चालण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळेत ऊर्जा निर्मिती व ऊर्जेचे व्यवस्थापन हा करियरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

स्वतःकडे पुरेसे भांडवल असेल किंवा ते मिळू शकत असेल तर तुम्ही स्वतः अपारंपरिक ऊर्जापासून वीज निर्माण करून शासनास, औद्योगिक कारखान्यांना विकू शकता. एखाद्या उद्योगास तुम्ही ऊर्जेचा वापर व व्यवस्थापन यासाठी सल्ला व मार्गदर्शन करू शकता.

अणुऊर्जा

मनमोहनसिंग यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे आपला अमेरिकेबरोबर जो करार झाला आहे, त्याची आता अंमलबजावणी होईल. या करारामुळे भारतात नवीन ऍटॉमिक एनर्जी (पॉवर) स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यात काम करण्यासाठी खूप मोठे मनुष्यबळ लागणार आहे. म्हणजेच अणुऊर्जा क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध असतील. ऊर्जानिर्मितीशिवाय अणुऊर्जा क्षेत्रात संशोधन करणारे व शिक्षण घेतलेल्या तरुणांना अनेक संधी आहेत.

पेट्रोइन्फॉर्मेटिक्‍स

शास्त्रज्ञ ऊर्जेसाठी विविध पर्यायांचा विचार व संशोधन करीत असले तरी अजून खनिज तेलाला पर्याय म्हणता येईल असा ऊर्जास्रोत मिळाला नाही; आणि तो मिळत नाही तोपर्यंत खनिज तेल विविध कारणांसाठी वापरले जाणार आहे. खनिज तेलाचा शोध घेणे ते खनिज तेलापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळविणे यामध्ये अनेक टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती लागत असतात. अलीकडे पेट्रोलियमचे उत्पादन वाढविण्यापासून खनिज तेलाच्या वापरापर्यंत संशोधनासाठी "पेट्रोइन्फॉर्मेटिक्‍स' ही शाखा उदयास आली आहे. या शाखेमध्ये पेट्रोलियमचे विविध पदार्थ, त्यांचे पृथ्थकरण, शुद्धीकरण, पेट्रोलियम पदार्थांचा वापर इ. चा संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या साह्याने अभ्यास केला जातो. पेट्रोइन्फॉर्मेटिक्‍सचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना या उद्योगात करियरची चांगली संधी आहेच; शिवाय ज्या ज्या देशात खनिज तेलाचे उत्पादन घेतले जाते, त्या देशांमध्येसुद्धा त्यांना चांगली मागणी असेल.

पेट्रोइन्फॉर्मेटिक्‍सचे शिक्षण देशात केवळ डेहराडून येथील ऑईल अँड पेट्रोलियम युनिव्हर्सिटीमध्ये दिले जाते.

अंतरिक्ष विज्ञान -

भारताने काही दिवसांपूर्वीच चंद्रावर मानवरहित उपग्रह पाठवून जगाला आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीची चांगलीच चुणूक दाखविली. आता भारतीय अवकाश संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन - इस्रो) चंद्रावर मानव पाठविण्याच्या प्रयत्नात आहे. मंगळावर भारतीय उपग्रह पाठविण्याचे इस्रोचे ध्येय आहे. अशा अवकाश मोहिमा एका दिवसात घडून येत नाहीत, तर त्यासाठी काही वर्षे अगोदर तयारी करावी लागते. या तयारीसाठी शेकडो लोक व हजारो हात लागत असतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. अंतरिक्ष विज्ञानाच्या अनेक उपशाखा ऍस्ट्रोफिजिक्‍स, ऍस्ट्रोकेमिस्ट्री, ऍस्ट्रो बॉयॉलाजी, ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रोजिऑलॉजी इ.मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना इस्रोमध्ये विपुल संधी आहेत. अमेरिकेच्या "नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन' - नासामध्येसुद्धा करियरची संधी मिळू शकते.

नॅनोतंत्रज्ञान (नॅनोटेक्‍नॉलॉजी) -

एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग. आपला केस नॅनोमीटरच्या सुमारे ५-१० हजार पट मोठा असतो. सुमारे शंभर नॅनोमीटर आकाराचे रेणू मिळविणे, पदार्थ, उपकरणे बनविणे व त्यासाठी संशोधन करणारे शास्त्र म्हणजे नॅनोतंत्रज्ञान! नॅनोतंत्रज्ञानाने आज अनेक क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. नॅनोतंत्रज्ञानाच्या तीन शाखा समजल्या जातात- नॅनोइलेक्‍ट्रॉनिक्‍स, नॅनोमटेरियल्स व नॅनो बॉयोटेक्‍नॉलॉजी!

नॅनोतंत्रज्ञानाचा पर्यावरण, एरोस्पेस, सौरऊर्जा, दूरसंवाद (टेलिकम्युनिकेशन) संगणक आदींवर फार मोठा प्रभाव आहे. न्यायसहायक वैद्यकशास्त्रात (फॉरेन्सिक सायन्स), वैद्यकशास्त्रात व्याधिग्रस्त मानवी अवयव दुरुस्त करण्याकरिता अतिसूक्ष्म यंत्रमानव (नॅनोबॉट) बनवून शरीरात सोडून त्यांच्याद्वारे अवयव वा उती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. वरील क्षेत्राशिवाय अलीकडे नॅनोमेडिसीन (नॅनोवैद्यकशास्त्र) नावाची शाखाच उदयास आली आहे. यामध्ये नॅनो आकारातील उपकरणे बनविण्यात येत आहे. याचबरोबर नॅनो फार्माकॉलॉजी (नॅनो औषध निर्माण शास्त्र) ही शाखाही विस्तारत आहे. या शाखेमुळे स्मार्ट ड्रग्ज (चलाख औषधे) बनविण्यात येत आहेत. या औषधांचे दुष्परिणाम (साईड इफेक्‍टस) किमान असतील व औषधी परिणाम मोठ्या प्रमाणात असतील.

अशा या नॅनोतंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी सर्व विकसित देश हजारो अब्ज रुपये खर्च करीत आहेत. भारतातसुद्धा अब्जावधी रुपये नॅनोतंत्रज्ञानातील संशोधनासाठी खर्च केले जाताहेत. देशातील ३८ राष्ट्रीय प्रयोगशांळांमध्ये व अनेक विद्यापीठे, आय.आय.टी.जमध्ये नॅनोटेक्‍नॉलॉजीविषयी संशोधन केले जाते. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना नॅनोतंत्रज्ञानात करियरच्या विपुल संधी आहेत.

केमिइन्फॉर्मेटिक्‍स -

औषध निर्मितीसाठी अनेक रसायनांची आवश्‍यकता असते. या रसायनांचा पूर्वीच्या पद्धतीने अभ्यास केल्यास प्रचंड वेळ जाऊ शकतो. अलीकडे असा रसायनांचा, त्यांच्या अभिक्रियांचा अभ्यास संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने केला जातो. या अभ्यासाला केमिइन्फॉर्मेटिक्‍स म्हणतात. एखादे औषध बनविण्यासाठी औषधी गुणधर्म असणारे रसायन शोधण्यासाठी या शास्त्राचा फार मोठा उपयोग होत आहे. औषधी रसायन शोधल्यानंतर त्याचा औषध म्हणून वापर केल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम (साईड इफेक्‍ट्‌स) कसे कमी करता येतील व औषध कसे अधिक प्रभावी होईल, यासाठी केमिइन्फॉर्मेटिक्‍समध्ये संशोधन केले जाते. औषधे निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये आपले औषध इतर निर्मात्यांपूर्वी बाजारात आणण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. अशा स्पर्धांमध्ये बाजी मारण्यासाठी केमिइन्फॉर्मेटिक्‍सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना औषधे निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये करियरची चांगली संधी आहे.

कार्बन सेक्‍टर व पर्यावरण -
सध्या पर्यावरणाची बेसुमार हानी होत आहे. विकासकामांमुळे व रसायनांचा, खनिजतेलाचा अतिरेकी वापर यामुळे क्षणोक्षणी पर्यावरण बळी जात आहे. सध्या जगभरच पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती होत चालली आहे. जगभर अनेक संस्था, एन.जी.ओ.ज (नानगव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स) पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत. अशा संस्थांना प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज असते.

पर्यावरणशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना एन्व्हायर्नमेंट इंजिनियर, सायंटिस्ट अशा प्रकारचे शिक्षण घेता येते व त्यानुसार करियरची संधी उपलब्ध होते.

संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंटल प्रोग्रॅम (यु.एन.ई.पी.) जगभरच राबवत असते. त्यासाठी युनोस पर्यावरणशास्त्राचे शिक्षण घेतलेले तरुण हवे असतात.

सध्या जागतिक तापमानवृद्धीचे (ग्लोबल वॉर्मिंग) अनेक दुष्परिणाम जाणवत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी वातावरणात मिसळणारा कार्बन हायऑक्‍साईड कमी करण्याविषयी जगभर संशोधन चालू आहे. एखाद्या उद्योगास एक टन कार्बनडायऑक्‍साईड उत्सर्जन कमी करण्याचे तंत्रज्ञान दिल्यास त्या उद्योगास एक कार्बन क्रेडिट मिळत असते. तसे झाल्यास तो उद्योग अधिक उत्पादन मिळवू शकते. असे तंत्रज्ञान सल्लागार जगभरातील अनेक उद्योगधंद्यांना सध्या अत्यावश्‍यक आहेत. त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी जे संशोधन चालू आहे, त्यामध्ये करियरसाठी आकर्षक संधी उपलब्ध आहेत.

हायड्रॉलॉजी -

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी, वातावरणातील पाणी (बाष्प) भूगर्भातील पाणी, पाण्याच्या मातीशी, खडकांशी होणाऱ्या क्रियांचा, पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हायड्रालॉजी किंवा जलशास्त्र. सध्या पाणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे; त्यामुळे पाण्याचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे होऊन बसले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात करियरसाठी पर्यावरण, भूगोल, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हायड्रॉलॉजीचा अभ्यास केला तर अनेक संधी उपलब्ध होतील. हायड्रॉलॉजीच्या अनेक उपशाखा असून, पाण्याचे व्यवस्थापन, पर्यावरणातील बदलांचा पाण्यावर होणारे परिणाम इ. चा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

वरील पर्यायांशिवाय विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आणखी काही नवीन पर्याय-जैवतंत्रज्ञान (बॉयोटेक्‍नॉलॉजी), जैवमाहिती तंत्रज्ञान (बॉयोइन्फॉर्मेटिक्‍स), भूमाहितीशास्त्र (जिओइन्फॉर्मेटिक्‍स) सागरविज्ञान उपलब्ध आहेत.

विज्ञानातील करियरसाठी येथे नवीन पर्यायांची थोडक्‍यात माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड, आपल्याला नेमकी कशात गती आहे, याचा विचार करून भविष्यात आपल्याला आवडणाऱ्या व गती असणाऱ्या क्षेत्राचे स्वरूप काय असेल, याचा विचार करून करियरचे क्षेत्र निवडावे.
शहाजी मोरे,

अधिव्याख्याता, रसायनशास्त्र विभाग,

महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी

No comments:

Post a Comment