| व्यक्तिमत्त्व विकासातून तणावमुक्ती! | ![]() | ![]() |
रमाकांत जाधव, बुधवार, २ सप्टेंबर २००९मूलभूत मानवी भावना, विचार, नातेसंबंध आणि अपयश सर्वत्र पाहवयास मिळते. यांत्रिक युगातल्या, घडय़ाळ्याच्या काटय़ाप्रमाणे मानावाचे जगणे आता अधिक तेज होताना दिसते आहे. कार्यालयात वेळेवर पोहोचण्याच्या स्पर्धेत कर्मचारी वर्गाला एका तणावातून जाताना भिती आणि उदासिनता जाणवते आहे. नोकरीला टिकवून ठेवणं याशिवाय चाकरमान्यांना पर्याय नाही. असा मी विचार करताना मे-२००९ चा ‘मेहता मराठी ग्रंथजगत अंक’ हाती आला. त्यात मला कळलं की, अशा अवस्थेत तणावमुक्त व्हायचं असाल तर कविता लिहा.. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाला सामोरे जावे लागते. तणाव कोणत्या गोष्टीने येईल हे सांगता येत नसले तरी, तणाव येतो हे मात्र खरे. तुम्हाला जर तणावमुक्त व्हायचं असेल तर कविता लिहा. हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. कविता लिहिणे पोषक ठरते. आपल्या भावना व त्यामुळे आलेला तणाव दूर करण्यास मदत होते. त्याबरोबर एखाद्या गोष्टीबद्दल असलेली भिती, उदासीनतासुद्धा कमी होते. यासाठी तुम्ही किती चांगली किंवा वाईट कविता केलीय हे महत्त्वाचे नाही. फक्त एवढे लक्षात ठेवा, कविता जेवढी व्याख्यात्मक आणि मोठी असेल तेवढी चांगली.’ संशोधकाचे असंही म्हणणं आहे की, शब्दांमध्ये स्वत:ला मांडणं म्हणजे आपल्या भावनांना एक प्रकारे लगाम घालण्यासारखे आहे. पुढे यावरील अंकात असंही सांगितलं आहे. ‘अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे डॉ. मॅथ्यू लिबरमॅन यांचे म्हणणे आहे की, कविता किंवा डायरी लिहिण्याची सवय असल्यास तणावावर नियंत्रण ठेवता येते, असे असले तरी तणाव कमी करण्यासाठी लोक लगेच कविता लिहिण्यास सुरुवात करतील, असे नाही पण प्रयत्न करण्यास काय हरकत आहे?’ माझे जवळचे स्नेही प्रा. प्र. श्री. नेरुरकर गेली चाळीस वर्षे (ते हयात असेपर्यंत) दैनंदिनी लिहावयाचे. दिवसभरात कोण भेटले अथवा कोण घरी आले, काय म्हणाले अथवा भारतात नव्हे जगात घडलेल्या घटनांवर दैनंदिनीत लिहायचे आणि त्या घटनांवर शेवटी नेरुरकरांना काय वाटले ते लिहायचे. त्यांची डायरी मी वाचली आहे. त्यातली काही प्रकरणं माझे मित्र आनंद माईणकर यांच्या दिवाळी अंकात (पलाश) आम्ही प्रकाशित केली आहेत. एकदा नेरुरकरांनी मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि लेखिका यांनी आपले घरातले ताणतणाव नेरुरकरांना खाजगीत सांगितले. ते लेखक आणि लेखिका कशा नेरुकरांच्या घरी रडल्या आणि नेरूरकरांनी त्यांना कसे समजाविले आणि त्यातून नेरुरकरांचे भाष्य मला त्यांनी त्यांच्या डायरीत दाखविले जाते. ते म्हणायचे ‘दुसऱ्यांच्या दु:खात, अडचणीत सहभागी झाल्यावर माझाही तणाव (नेरुरकरांच्या पत्नीसुद्धा दीर्घ आजारांनी घरीच होत्या.) कमी होतो. नेरूरकर तसे नव्याने लिहिणाऱ्या तरुणांचे मित्र होते. अनेक नवं लेखकांना मार्गदर्शन करावयाचेच, एवढेच नव्हे तर त्यांना प्रस्तावनासुद्धा लिहून द्यावयाचे. त्यानंतर नेरुरकर त्या नवोदित लेखकांच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाल्यावर ‘मानधन’ घेत नसत. हे सगळं ते मनापासून करीत. ते तरुण असताना त्यांनासुद्धा अनेकांनी त्यांच्या लिहिल्या हाताला मदत केली होती. ही जाणीव त्यांनी ठेवली होती. अशा व्यक्तिमत्त्वातून ते घडत होते. ख्यातनाम व्हायोलिन वादक बाळ साठे यांचा जेव्हा माझा पंधरा वर्षांपूर्वी परिचय झाला तेव्हा त्यांनी आयुष्यातील एक घटना सांगितली. डॉ. आंबेडकर पहिल्या भारतीय मंत्रिमंडळात असताना डॉ. आंबेडकरांना ते व्हायोलिन वाद्य शिकवित होते. उतारवयात या महामानवाला व्हायोलिन तंतुवाद्य का शिकावे वाटले असेल! या विषयी मानसिकता अभ्यासली तर असे कळते की, तंतुवाद्यातून निघालेले सूर मानवाला ताणतणाव कमी करावयास मदत करतात. अलीकडे असे सिद्ध झाले आहे की, हृदयरोगी मंडळींनी तंतुवाद्यात बांधलेले शास्त्रीय संगीत ऐकले तर हृदयरोग्यांना ‘रिलिफ’ मिळतो. एवढेच नव्हे तर गाईचे दूध काढताना गाईला संगीत ऐकविले तर ती गाय जास्तीचे दूध देते. अथवा संगीत ऐकताना झाड लावले तर झाडाची वाढ चांगली होते. माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे. राष्ट्रपती होण्याआधी, असताना व नंतरही ती आवड त्यांनी जपली. एक शास्त्रज्ञ जो जीव ओतून आपल्या संशोधनात मग्न असताना संगीताची, वाचनाची, बागेची आवड जपतो या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. त्यांनी घेतलेली मेहनत, त्याच्या वेळची परिस्थिती प्रतिकूल होती. त्यांनी शिक्षणासाठी परिस्थितीवर मात कशी केली? हे विसरण्यासाठी म्हणण्यापेक्षा, त्यांना संगीत शिकता आले नाही. आपल्या आवडी निवडी जपता आल्या नाहीत. म्हणून ही थोर माणसं संगीतात, वाचनात रमताना दिसतात. अशी जगातली थोर माणसं वाचली, पाहिली की, मग कळते की, उतारवयात चित्रकला शिकायला लागतात. हे मानवी रसायन कळायला तेवढं सोपं नाही. पण खोलवर पाहिल्यावर कळतं की,उतारवयात त्यांना ताणतणावातून मुक्तता हवी असते. शांतता हवी असते. निवान्तपणा हवा असतो. दोन पायाच्या प्राण्यापासून दूर जावसं वाटतं. हेवेदावे, द्वेष, मत्सर, स्वार्थ यापासून अशा थोर पुरुषांना मानसिक स्वास्थ्य हवे असते. ही शोधण्याची चाललेली धडपड त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेते. हेच ते काय होय. |


रमाकांत जाधव, बुधवार, २ सप्टेंबर २००९
No comments:
Post a Comment