Sunday, September 6, 2009

नॅनो टेक्नॉलॉजीतील करिअर संधी
मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे, तरी कृपया मला नॅनो टेक्नॉलॉजीसंदर्भात माहिती द्यावी.
- प्रीती परांजपे.
एकविसाव्या शतकातल्या आजच्या विज्ञानाला मात्र वेड आहे ते सूक्ष्मतेचे, अतिसक्ष्मतेचे. सूक्ष्मतेकडून अतिसूक्ष्मतेकडचा हा प्रवास म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी. या नॅनो टेक्नॉलॉजीच्या करामतीने मानवाचा येता भविष्यकाळ बदलून जाईल.
मेडिकल सायन्समध्ये कॉण्टॅक्ट लेन्समधून औषधे दिली जातील, शरीरातील टय़ूमर काढण्यासाठी नॅनो बॉम्ब वा नॅनो बुलेटस्चा वापर केला जाईल. नॅनो पार्टिकल्सच्या सहाय्याने कॅन्सरवर मात केली जाईल. नॅनो टेक्नॉलॉजीच्या छोटय़ा प्रोबने आरोग्याची देखभाल व काळजी घेतली जाईल. एवढंच नाही, तर अगदी नवीन अवयवाची निर्मितीदेखील यातून केली जाईल. शरीरातील पेशींमध्ये काय चालले आहे, हे बघण्यासाठी बायोकेमिस्ट शरीरात नॅनो कॅमेरा सोडतील.
कॉम्प्युटरचा (हार्ड डिस्क, चीप्सचा) आकार दिवसेंदिवस अधिक लहान होईल. पण वेग व क्षमतेमध्ये मात्र कमालीची वाढ होईल. प्रयोगाअंती बॅक्टेरियामध्ये कॉम्प्युटरचे छोटे भाग तयार करता येतील हे सिद्ध झाले आहे. पर्यावरणशास्त्रामध्ये तर नॅनो

टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जड पाण्यापासून बॅक्टेरिया व विषारी द्रव्ये वेगळी काढून शुद्ध पाणी मिळू शकेल.
सोलर एनर्जीदेखील नॅनो टेक्नॉलॉजीमुळे कमी खर्चिक होईल. नॅनो पार्टिकल्सचा कॅटेलिस्ट म्हणून वापर करून इंधन क्षमतेत वाढ केली जाईल. अधिक प्रकाश देणाऱ्या व कमी वीज लागणाऱ्या एल. ई. डी. नेहमीच्या बल्बऐवजी विकसित करण्यात येतील. विजेची मोठी बचत यामुळे होईल.
मिलिटरीमध्येदेखील यामुळे आमूलाग्र बदल होईल. नॅनो सेन्सरच्या सहाय्याने केमिकल वा बायोलॉजिक बॉम्ब शोधले जातील. शस्त्रास्त्रे व अन्य अवजारे वजनाने अतिशय हलकी होतील.
नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर रोजच्या जीवनातील कपडे, सनस्क्रीन लोशन, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिक्स आणि विविध औषधांमध्येसुद्धा केला जाईल. यामुळे उत्पादने मजबूत होतील, पण त्याच वेळी ती जाडीला कमीपण असतील. गंजप्रतिरोधक, किटाणूंपासून सुरक्षित असतील.
वॉिशग मशिन्स, ए. सी.मध्ये आताच सिल्व्हर नॅनो मॉडेल आली आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या योग्य वापराने मानवी जीवन अधिक समृद्ध होऊ शकेल. प्रदूषण, पर्यावरणसंबंधातील प्रश्नांवर त्यामुळे मात करता येईल. अतिशय कमी जागेमध्ये तसेच कमी ऊर्जा लागणारे नवे कारखाने येतील.
नॅनो टेक्नॉलॉजी ही नॅनोमीटरच्या आकारातील टेक्नॉलॉजी आहे. एक नॅनोमीटर म्हणजे मीटरचा एकअब्जांश होय. मानवी केसाच्या व्यासापेक्षा ५००० ते ५०,००० पट लहान आकार आहे. नॅनो टेक्नॉलॉजी ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र व अभियांत्रिकी या शाखा मिळून तयार झालेली नवीन आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी आहे.
नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग पडतात-
१. नॅनो मटेरियल्स
२. नॅनो इलेक्ट्रॉनिक्स
३. नॅनो बायोटेक्नोलॉजी
पर्यावरण, एरोस्पेस इंजिनीयरिंग, टेलिकम्युनिकेशन, सौरऊर्जा व संगणक क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. या शास्त्राचा उपयोग पदार्थाचा गुणधर्म बदलण्यासाठी होणार असून, यामुळे बायोटेक्नॉलॉजी अधिक विकसित होईल. नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग सध्या संगणक, टेलिकम्युनिकेशन व वैद्यकीय उपकरणांमध्ये केला जातो.
अणू व परमाणूमध्ये एकत्रितपणे बदल घडवण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश मिळत असून, त्यात काटेकोरपणे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, भविष्यकाळात आपण आवश्यकतेनुसार वस्तूची पुनर्रचना करू शकतो. नॅनो मटेरियल्स हे वजनाने अतिशय हलके, मजबूत, पारदर्शी असतील.
नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग इतरही अनेक क्षेत्रांमध्ये होणार आहे. अमली पदार्थाचा शोध घेणे तसेच गुन्ह्यांमधील संशयितांची फिंगर प्रिंटस् तपासणे, रोबोटची निर्मिती करणे, शरीरातील दुखावलेल्या तसेच रोगग्रस्त टिश्यूवर उपचार करणे आदी क्षेत्रांत नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर होईल.
नॅनो रोबोट्स (नॅनोमीटर आकारातील रोबोट्स) मानवाप्रमाणे काम करण्यासाठी वापरण्यात येतील. नॅनो कोटिंग अनेक क्षेत्रांत वापरण्यात येतील जी पारदर्शी, स्क्रॅच प्रूफ तसेच धुळीपासून संरक्षण करणारी असतील. एकूणच भविष्यात सर्वच क्षेत्रांत नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर अपरिहार्य ठरणार आहे.
नॅनोटेक्नॉलॉजीचा उपयोग भविष्यात वैद्यकीय शाखेत मोठय़ा प्रमाणावर रोगनिदान करण्यासाठी, उपचार करण्यासाठी व रोग प्रतिकारतेसाठी तसेच अपघातातून बरे होण्यासाठी, वेदना निवारणासाठी होणार आहे. यासाठी आवश्यक नॅनो उपकरणांची रचना करण्यात येईल. नॅनो फॉरमॅकोलॉजीमध्ये बायोलॉजिकल लॅक्टिव्ह संयुगाबरोबर विशेष तयार केलेली नॅनो मटेरियल्स जोडण्यात येतील. याचा उपयोग रोगातील आघातग्रस्त पेशी शोधण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी केला जाईल.
रोजगाराच्या संधी
नॅनोटेक्नॉलॉजीमधील शिक्षणानंतर बायोटेक कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मेडिकल क्षेत्रातील संबंधितांसाठी नॅनो मेडिसिनमध्ये संधी आहेत. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्येदेखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बरोबरीनेच संशोधनाच्या क्षेत्रात शासकीय प्रयोगशाळांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रम
नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये सध्या तरी पदवी स्तरावर अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नाही. भविष्यामध्ये आयआयटीमध्ये बी.टेक स्तरावर हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विचार चालला आहे. नॅनोटेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या आयआयटीमध्ये चालवले जातात. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर या ठिकाणीदेखील नॅनोटेक्नॉलॉजीवरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदींपैकी विषयांतील पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. नॅनोटेक्नॉलॉजीमधील पीएच.डी.साठी मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्समधील एम.टेक. पदवी किंवा एम.एस्सी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मटेरियल्स सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्समधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
शिक्षण संस्था
अ‍ॅमिटी विद्यापीठ (दिल्ली)
या संस्थेच्या अ‍ॅमिटी इन्स्टिटय़ूट ऑफ नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक. (नॅनोटेक्नॉलॉजी) व एम. एस्सी. (नॅनो सायन्स) असे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संपर्क : अ‍ॅमिटी इन्स्टिटय़ूट ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी,
अ‍ॅमिटी कॅम्पस, सेक्टर- १२९,
नोएडा- २०१३०३
दूरध्वनी- ०१२०-२४३२७८०/८१
www.unom.ac.in
युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, चेन्नई, या ठिकाणी एम.एस्सी. (नॅनो सायन्स), एक. टेक (नॅनोटेक्नॉलॉजी) हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पंजाब विद्यापीठ, चंदीगड.
या विद्यापीठात एम. टेक (नॅनो सायन्स/ नॅनोटेक्नॉलॉजी)
हा अभ्यासक्रम चालविला जातो.
www.puchd.ac.in.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स,
बंगलोर, www.iisc.erent.in
जादवपूर विद्यापीठ, कोलकाता
www.jadavpu.edue
या ठिकाणी नॅनोटेक्नॉलॉजीमधील मास्टर्स व पीएच.डी.चे शिक्षण उपलब्ध आहे.
आयआयटी मुंबई www.iitb.ac.in
आयआयटी मद्रास www.iitm.ac.in
आयआयटी कानपूर www.iitk.ac.in
आयआयटी खरगपूर www.iitkgp.erent.in
आयआयटी दिल्ली www.iitd.ac.in
आयआयटी गुवाहाटी www.iitg.erent.in
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.

No comments:

Post a Comment