Wednesday, September 23, 2009

क्षितिजापलीकडे..PrintE-mail
बुधवार, २३ सप्टेंबर २००९
प्रशांत ओचावार - bom@bom2.vsnl.net.in

कुणीतरी म्हटलंच आहे, आयुष्य म्हणजे ऊन-सावलीचा खेळ. कधी उन्हाळा, तर कधी पावसाळा. प्रत्येकाच्याच जीवनात पाठशिवणीचा खेळ चालू असतो. कोणी हरतो तर कुणी विजयी होतो. हा लेख प्रकाशित होईपर्यंत कदाचित ग्रीष्माचा तीव्र उकाडा संपून मृगाची चाहूल लागलेली असेल. कदाचित पाल्यांच्या जीवनात रिम-झिम श्रावण बरसू लागेल मात्र त्या वेळी पालकांच्या मनात अथांग विचारांनी थैमान घातलेलं असेल. मृगाच्या पहिल्या सरीसोबतच कदाचित १० वी १२ वीचे निकालही घोषित झालेले असतील. चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झालेल्यांना शक्यतोवर फारसा प्रश्न पडणार नाही. मात्र कमी गुण मिळविणारे किंवा नापास झालेले यांच्यापुढील समस्या मात्र बिकट झालेल्या असतील. किंबहुना बहुतेकांना निराशेनेही घेरलेले असू शकते. अशा वेळी म्हणूनच गरज पडते ती योग्य आधाराची. नापास झालो किंवा कमी गुण मिळालेत म्हणून हताश होण्यापेक्षा अधिक उत्साहाने आपण कुठे कमी पडलो, आपली नेमकी आवड काय आहे, आपण कुठल्या दिशेने प्रयत्न केलेत म्हणजे आपल्याला यशाची चव चाखता येईल, या बाबींचा ऊहापोह व्हायला हवा. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात दिसून येतील की, ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी असूनसुद्धा ते आज दुसऱ्याकरिता आदर्श बनून आहेत. मात्र याचा अर्थ आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोठं होण्याचा किंवा यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा असे माझे म्हणणे मुळीच नाही. आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना योग्य शिक्षणाची जर का जोड मिळाली तर यशाचे शिखर पादाक्रांत करायला जास्त मदत मिळू शकते.
कधी नव्हे ते जग आज जवळ आलंय. दहा वर्षांपूर्वीचा जरी विचार केलात तरी असं वाटून जातं की, हे त्या वेळी असते तर कदाचित आपल्या जीवनाची दिशा बदलली असती. आज कधी नव्हे तेवढे पर्याय आपल्याला उपलब्ध असून थोडीशी चौकसपणा दाखविला तर आपणही नक्कीच शून्यातून विश्व उभं करू शकतो. केवळ इंजिनीअरिंग, मेडिकल, एमबीए म्हणजेच परिपूर्ण शैक्षणिक विश्व नव्हे. तर या व्यतिरिक्तही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांचा आपण योग्य उपयोग केलात तर आपल्याला अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. किंबहुना तुम्ही स्वत: दुसऱ्यांकरिता आदर्शही बनू शकता.
सुदैवाने भारत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सरकार अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच उत्तेजन देत आलं आहे. मात्र तो ज्या प्रमाणात सामान्यांपर्यंत पोहोचायला हवा तसा प्रसार झाला नाही असे फार तर आपण म्हणू शकतो. मग याला जबाबदार म्हणून आपण भ्रष्ट राजकारणी किंवा बेजबाबदार नोकरशहा यांच्याकडे अंगुलीनिर्देश करू शकतो. मात्र ‘सिस्टीम’च चुकीची आहे हे म्हणणे धारिष्टय़ाचे ठरेल. असू द्या हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की उपलब्ध संसाधनामधून योग्य पर्याय निवडून आपण आपलं जीवन सुखकर करणं याकडे लक्ष द्यायला हवं.
महाराष्ट्र राज्याचाच विचार करायचा झाल्यास राज्य सरकारने विविध संस्थांच्या माध्यमातून दूरगामी विचाराने या क्षेत्रात अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले असून योग्य पर्यायाचा विचार आपण आपल्या क्षमतेनुसार नक्कीच करायला हवा. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. या मंडळामार्फत विविध संस्थांतर्फे बऱ्याच प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. उदाहरणादाखल-
१) पॅरामेडिकल- अ‍ॅक्युप्रेशर आणि मसाज थेरपी, लाईफ सपोर्ट केअर असिस्टंट, मेडिकल रिसेप्शनिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, योगा आणि नॅचरोपॅथी.
२) कॉम्प्युटर- इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी, एम.एस. ऑफिस, वेब पेज डिझाइनिंग इ.
३) कुकरी कोर्सेस.
४) क्राफ्टमनशिप कोर्सेस इन हॉटेल मॅनेजमेंट, फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सव्‍‌र्हिस आणि मॅनेजमेंट, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग, ट्रॅव्हल आणि टुरिझम इ.
५) इलेक्ट्रिकल वायरमन- फिशरी, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅशन डिझाइनिंग, हस्तकला, लेदर स्टिचिंग, मोबाइल रिपेअरिंग, सुवर्णकला, तारतंत्री, कृषीपणन इ. विविध प्रकारचे कमी अधिक कालावधीचे कमी खर्चात होऊ शकणारे मात्र जास्त नफा मिळवून देऊन स्वयंभू बनविणारे अभ्यासक्रम आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतील. मात्र गरज आहे ती ‘व्हाईट कॉलर’ संस्कृतीच्या बाहेर डोकावण्याची. स्वत:चं भवितव्य स्वत: बनवू याची जिद्द बाळगण्याची.
या व्यतिरिक्तही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स, तसेच आयटीआयमार्फत आपण अनेकविध पर्यायांची निवड करू शकतो. ज्यांची परिस्थिती हलाखीची असेल मात्र तांत्रिक शिक्षण घेऊन पुढे जाऊ इच्छित असेल अशांकरिता भारत सरकार तसेच राज्य सरकार यांच्या अखत्यारीतील मानव संसाधन मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅप्रेन्टिस’ प्रोग्रामचा लाभ आपण घेऊ शकतो.
तेव्हा मित्रांनो, केवळ दहावी- बारावीत कमी मार्कस् मिळालेत किंवा नापास झालात म्हणून डोक्याला हात लावून बसण्यात उपयोग नाही. दिवसेंदिवस माणसां-माणसांतली स्पर्धा वाढणार असून कुशल कामगार व तंत्रकुशल मनुष्यबळ ही उद्याच्या जगाची ओळख आहे. आणि म्हणूनच आपलं गाव- आपली सोसायटी- एवढंच आपलं क्षितिज समजण्यात अर्थ नाही. या क्षितिजापलीकडे जर डोकावलं तर नक्कीच संपूर्ण आभाळ मोकळं असल्याचं दिसेल.

    No comments:

    Post a Comment