Sunday, September 6, 2009

एरोबिक्स आणि न्यूरोबिक्सPrintE-mail
डॉ. यश वेलणकर, गुरुवार, २७ ऑगस्ट २००९
एरोबिक्समुळे ताजेतवाने, फ्रेश वाटते कारण मेंदूकडील रक्तपुरवठाही सुधारतो. डिप्रेशन कमी होते, पण प्रत्यक्ष मेंदूला काही व्यायाम घडत नाही. आपल्या मेंदूला फिट ठेवायचे असेल, बुद्धी व स्मृती वाढवायची असेल, स्मृतिभ्रंश, अल्झायमरसारखा महाभयंकर आजार टाळायचा असेल तर विशिष्ट कृती, विशिष्ट व्यायाम करायला हवा. मेंदूला व्यायाम घडविणाऱ्या या कृती म्हणजेच न्यूरोबिक्स!
तुम्ही ‘एरोबिक्स’ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. टी.व्ही.वर म्युझिकच्या तालावर व्यायाम करायला शिकवणारी सुंदर आणि सुडौल तरुणी कधी ना कधी पाहिली असेल. काहींनी एखाद्या जिममध्ये जाऊन म्युझिकच्या तालावर डान्स करीत ‘एरोबिक्स’ अनुभवलेही असेल. टी.व्ही.वर दिसणारा कार्यक्रमदेखील या तरुणीला पाहण्यासाठी नसतो. तिच्याबरोबर आणि तिच्या गतीने आपण आपल्या शरीराच्या हालचाली करायच्या असतात आणि तशा हालचाली केल्या म्हणजे होणाऱ्या व्यायामाला एरोबिक एक्झरसाईज म्हणतात.
एरोबिक एक्झरसाईज हा शब्द सर्वप्रथम डॉ. केनेथ कूपर आणि कर्नल पॉलिन पॉट यांनी १९६८ साली त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकात वापरला. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनसहित. एरोबिक्स म्हणजे ऑक्सिजन वापरीत केलेला व्यायाम! व्यायाम तर माणसे प्राचीन काळापासून करीत आलेली आहेत मग या जोडगोळीने नवीन काय सांगितले. त्यांनी एरोबिक्स आणि अनएरोबिक एक्झरसाईज यातला फरक स्पष्ट केला. अमेरिकन एअरफोर्समध्ये काम करीत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की काही तगडे आणि धष्टपुष्ट जवान फार वेळ पळू शकत नाहीत किंवा अधिक काळ पोहू शकत नाहीत. ते लवकर थकतात, त्यांना धाप लागते. एखादी व्यक्ती सशक्त व सुदृढ दिसत असली तरी तिचा स्टॅमिना, दम चांगला असतोच असं नाही. याचे कारण तिच्या शरीराचे स्नायू पुष्ट असले तरी तिच्या हृदयाची व फुफ्फुसांची क्षमता विकसित झालेली असतेच असे नाही. ती व्यक्ती दिसायला दणकट दिसली तरी दहा-पंधरा मिनिटे वेगाने चालली तरी धापा टाकू लागते. वेटलिफ्टिंगसारख्या स्नायूंची शक्ती वाढवणाऱ्या व्यायामामुळे पोटावर एट पॅक्स बिस्किटे दिसू लागतील, शरीराच्या स्नायूंचे सौष्ठव खुलून येईल, पण यामुळे हृदयाची व फुफ्फुसांची क्षमता वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी एरोबिक एक्झरसाईजच करावे लागतील.
डॉ. कूपर यांनी एरोबिक व अनएरोबिक या व्यायामातील फरक स्पष्ट केला. त्यांचे फायदे-तोटे सांगितले. स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी, बॉडीमास म्हणजेच मांस वाढवण्यासाठी स्नायूंना विरोधाला तोंड देत काम करायला लावले जाते. वजने उचलताना किंवा स्प्रिंग ताणताना शरीराचे स्नायू ऑक्सिजन न वापरता तयार झालेली ऊर्जा वापरतात. म्हणून तो अनएरोबिक एक्झरसाईज. फक्त असाच व्यायाम केल्याने एअरफोर्समधील जवान बलदंड झाले होते, पण त्यांचा स्टॅमिना वाढला नव्हता. त्यासाठी डॉ. कूपर यांनी एरोबिक्स सुरू केले. शरीराच्या हालचाली हळूहळू वेग वाढवीत बराच वेळ करीत राहायच्या. असे करताना शरीर ऑक्सिजनमुळे तयार झलेली ऊर्जा वापरते. श्वासाची गती, हृदयाचे ठोके वाढतात, भराभर चालणे, जॉगिंग, उडय़ा मारणे, नाच करणे, सायकलिंग, ट्रेडमिलवर पळणे, सावकाश पोहणे हे सर्व एरोबिक व्यायामप्रकार आहेत. या व्यायामामुळे शरीरसौष्ठव खुलणार नाही पण हृदय अधिक मजबूत होईल. हृदयामध्ये नवीन रक्तवाहिन्या, कोलॅटरल्स तयार होतील, फुफ्फुसांचा सर्व भाग वापरला जाईल. सर्व शरीरातील रक्तपुरवठा निरोगी होईल, रक्तातील रक्तपेशींची संख्या वाढेल. एरोबिक्सचे हे फायदे प्रत्यक्ष दिसू लागल्याने हे व्यायामप्रकार जगभर पसरले, सर्वत्र लोकप्रिय झाले.
एरोबिक्समुळे हृदयाला व फुफ्फुसांना व्यायाम मिळतो. त्यांचे आरोग्य चांगले राहते. हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो, पण स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होत नाही. आपल्या शरीरात ‘मेंदू’ हादेखील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याला व्यायाम कसा घडवायचा, त्याची क्षमता कशी वाढवायची? एरोबिक्समुळे ताजेतवाने, फ्रेश वाटते कारण मेंदूकडील रक्तपुरवठाही सुधारतो. डिप्रेशन कमी होते, पण प्रत्यक्ष मेंदूला काही व्यायाम घडत नाही. आपल्या मेंदूला फिट ठेवायचे असेल, बुद्धी व स्मृती वाढवायची असेल, स्मृतिभ्रंश, अल्झायमरसारखा महाभयंकर आजार टाळायचा असेल तर विशिष्ट कृती, विशिष्ट व्यायाम करायला हवा. मेंदूला व्यायाम घडवणाऱ्या या कृती म्हणजेच न्यूरोबिक्स!
एरोबिक्ससारखाच वाटणारा न्यूरोबिक्स हा शब्द प्रथम वापरला डॉ. लॅरी काट्झ (Dr. Larry Katz) यांनी, ते आहेत डय़ूच युनिव्हर्सिटीत मेंदूवर संशोधन करणारे न्यूरोसायंटिस्ट. मानवी मेंदूतील पेशींची वाढ हाच त्यांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा विजय आहे. पूर्वी असा समज होता की ठराविक वयानंतर मानवी मेंदूची वाढ थांबते. काही प्रमाणात ते खरेही आहे. पण त्याचा दोष मेंदूचा नसतो, आपल्या आळशीपणाचा असतो. ठराविक वयानंतर आपले आयुष्य इतके चाकोरीबद्ध आणि यांत्रिक होते की बिचाऱ्या मेंदूला फारसे नवीन कामच मिळत नाही. मेंदूला काम दिले, व्यायाम करायला लावला तर प्रौढ वयातदेखील त्याची वाढ होते. हे मेंदूवरील आधुनिक संशोधनातून स्पष्ट होत आहे आणि या संशोधनातूनच न्यूरोबिक्स (neurobics) ही संकल्पना जन्माला आली आहे.
आपला मेंदू हे एक अजब रसायन आहे. कवटीच्या हाडांच्या आतील पोकळीत त्याच्या संरक्षणाची अफलातून व्यवस्था केलेली आहे. साध्यासुध्या धक्क्यांनी त्याला हादरे बसू नयेत म्हणून तो पाण्यात तरंगणाऱ्या लोण्याच्या गोळ्यासारखा त्याच्या आजूबाजूला असलेल्या द्रवपदार्थात तरंगत असतो. शरीराच्या सर्वोच्च स्थानी तो राहात असला तरी पायापर्यंतच्या प्रत्येक पेशीशी त्याचा संपर्क असतो. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या ज्ञानेंद्रिंयामार्फत तो परिसराची माहिती मिळवीत असतो. त्या माहितीचे तो विश्लेषण करतो, प्रोसेसिंग करतो आणि शरीराच्या स्नायूंना हुकूम देऊन त्यांच्याकडून हालचाली करवून घेतो. आता एकाच वेळी इतकी कामे करायची असल्याने तो टाईम मॅनेजमेंटची काही सूत्रे वापरतो. स्वत:ची काही कामे तो आपल्या साहाय्यकांना म्हणजेच अधोमेंदू आणि मज्जारज्जूतील काही केंद्रांकडे सोपवतो. तुम्हाला आठवत असेल तुम्ही प्रथम सायकल चालवायला किंवा बाईक चालवायला शिकलात. त्याच वेळी पॅडेल मारायच्या किंवा क्लच सोडत अ‍ॅक्सिलेटर वाढवण्याच्या हालचाली जाणीवपूर्वक करीत होतात, त्या वेळी तुमच्या मेंदूला काय करावे लागत होते, पण नंतर प्रॅक्टिस झाली आणि आता या कृती सहज सवयीने होतात. एखादी कृती सवयीने, नकळतपणे केली जाते त्यावेळी त्यामध्ये मेंदूचा फारसा सहभाग नसतो. मेंदूने ती कृती करून घेण्याचे काम त्याच्या साहाय्यकांकडे सोपवलेले असते मेंदू स्वत: नवीन काही तरी शिकण्यासाठी उत्सुक असतो, त्यासाठी स्वत:ची कामे इतरांकडे सोपवून तो स्वत: मोकळा राहतो, एखाद्या कार्यक्षम व्यवस्थापकासारखा, पण त्या व्यवस्थापकाला नवीन कामच मिळाले नाही तर तो हळूहळू आळशी होतो. आपल्या मेंदूचेही तसेच होते. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा कृती इतक्या यांत्रिक होऊ लागतात. आपण झोपून उठल्यापासूनच्या सगळ्या हालचाली सवयीनेच करीत जातो. त्यामुळे Use it or lose it या निसर्गनियमाने मेंदूच्या क्षमता कमी होऊ लागतात. मेंदूतील दोन पेशींना जोडणारे नवीन कनेक्शन तयार व्हायचे थांबते आणि आपल्याला मात्र वाटतं की ठराविक वयानंतर मेंदूची वाढ थांबते. ती थांबते याचे कारण आपण त्याला नवीन काम देत नाही. त्याची वाढ सतत चालू ठेवायची असते, आपल्या मेंदूला चिरतरुण ठेवायचे असले तर त्याची नवीन शिकण्याची हौस पुरी करायला हवी. यांत्रिक हालचाली कमी करून न्यूरोबिक्स करायला हवीत. न्यूरोबिक्स म्हणजे मेंदूच्या पेशींना काम करायला लावणाऱ्या शरीराच्या हालचाली, ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातदेखील सहजतेने करू शकता.
त्यासाठी काय करायचे? रोजच्याच कृती, पण वेगळ्या प्रकारे करायच्या. तुम्ही नेहमी उजव्या हाताने दात घासत असाल तर उद्या हात बदलायचा, डाव्या हाताने दात घासायचे. तुम्ही तुमच्या सवयीच्या हाताने ब्रशिंग करीत असता तेव्हा बऱ्याचदा ते अजाणता होत असते. तुमचा हात आपले काम करीत असतो. पण त्या वेळी मेंदूला मात्र काम करावे लागत नसते. तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या हाताने दात घासू लागता त्या वेळी मात्र मेंदूच्या पेशींना काम करावे लागते. त्यांचा व्यायाम होतो. तुमच्या कमी वापरल्या जाणाऱ्या हाताला अधिकाधिक कामे देत राहणे हे मेंदूसाठी नवीन शिक्षणच असते. अशी कामे करावी लागतात त्या वेळी त्याच्या विरुद्ध बाजूच्या मेंदूच्या अर्धगोलामध्ये नवीन पेशी कार्यरत होतात, त्यांची क्षमता वाढते. न्यूरोबिक्सचे हेच साधे सोपे सूत्र आहे.
काही न्यूरोबिक्स
१) नेहमीपेक्षा वेगळ्या हाताने दात घासा, जेवताना घास घ्या, दरवाजा उघडण्यासाठी, कडी काढण्यासाठी सवयीच्या हातापेक्षा दुसरा हात वापरा.
२) डोळे बंद करून आंघोळ करा, डोळे बंद करून किंवा घरात पूर्ण काळोख करून घरात चाला.
३) डोळे बंद करून स्पर्शाने नाणी ओळखा, नोटा ओळखण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळी धान्ये ओळखा.
४) नेहमीपेक्षा वेगळ्या हाताने चित्रे काढा, लिहिण्याचा प्रयत्न करा.
५)चालताना होणाऱ्या पायाच्या आवाजावरून व्यक्ती ओळखा.
६) शतपावली घालताना उलटे, पाठीकडे चाला.
७) तोंडाने न बोलता खाणाखुणा करून एकमेकांशी संवाद साधा.
८) डोळे बंद करून वासाने पदार्थ ओळखा, चवीने सरबत ओळखा.
९) पूर्ण अंधार करून जेवा.
आपले डोळे हे अतिशय प्रभावी ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्या प्रभावामुळे इतर ज्ञानेंद्रियांशी संबंधित मेंदूतील पेशींना फार कमी वेळ आपल्या क्षमता वापराव्या लागतात. अंध व्यक्ती केवळ स्पर्शाने नोटा ओळखू शकतात. कारण स्पर्शासंबंधीच्या त्यांच्या मेंदूतील पेशी वापरल्या जातात. न्यूरोबिक्स करताना आपणही मेंदूतील स्पर्श, ध्वनी, गंध यांच्याशी संबंधित पेशींना काम दिले तर मेंदूतील पेशींमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात. नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळ्या कृती करायला मिळाल्या की मेंदूला नवसंजीवनी मिळते.
आपला कम्फर्ट झोन सोडून थोडा वेळ का होईना पण करेज झोनमध्ये यायला हवे. काही तरी नवीन, काही तरी वेगळे करायला हवे. काही नवीन अनोळखी माणसांना भेटायला हवे. नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्याने फिरायला हवे, निराळ्या हॉटेलात जाऊन नवीन डिश चाखायला हवी , आपले ठराविक वर्तुळ सोडायला हवे. चाकोरीच्या बाहेर पडायला हवे. असे करतो त्याच वेळी मेंदूचा चार्म कायम राहतो, तो सक्रिय राहतो. ‘नो पेन, नो गेन’ हे सूत्र एरोबिक्स व न्यूरोबिक्स दोन्ही ठिकाणी खरे ठरते. न्यूरोबिक्स करायचे म्हणजे मेंदूला त्याचा आळस झटकून टाकायला लावायचा. त्याला नेहमीपेक्षा, रुटीनपेक्षा थोडेसे जास्त काम करायला लावायचे. आपण कोणत्याही वेगळा, नवीन अनुभव घेतो त्या वेळीच मेंदू नवीन उत्साहाने काम करू लागतो.

    No comments:

    Post a Comment