Sunday, September 6, 2009

फूड व डेअरी टेक्नॉलॉजीतील आकर्षक संधीPrintE-mail
मी बारावी विज्ञान शाखेत शिकत असून मला फूड व डेअरी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शासकीय व खाजगी संस्थांची तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कोणत्या याबाबत माहिती द्यावी?
- शिल्पा घाटकर

आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकासाठी मिळणारा वेळ कमी कमी होत असताना रेडी टू कूक, रेडी टू इट पदार्थानी काम खरोखरच सुकर बनत आहे. आंब्याचा मोसम नसताना अगदी ताजा वाटेल असा आमरस, मटारांचा मोसम नसतानाही उपलब्ध होणारा पिशवीबंद उत्तम मटार, नारळाचं दूध काढण्याच्या त्रासातून सुटका करून देणारं पॅकबंद नारळाचं दूध, अजिबात साफ करण्याची आवश्यकता नसलेलं चिकन/मटण अशा अनेक पदार्थानी आता स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. अशाच उपयुक्त अन्नपदार्थाची निर्मिती करणारं शास्त्र म्हणजे फूड टेक्नॉलॉजी!
नाशिवंत अन्नपदार्थ टिकाऊ बनावेत या दृष्टीने त्यावर प्रक्रिया करणं, पण हे करताना अन्नपदार्थामधली पोषणद्रव्यं, गुणवत्ता, रंग-रूप यांचंही जतन करणं ही तारेवरची कसरत कुशलतेने करणाऱ्या फूड टेक्नोलॉजिस्टचं व्यवसायक्षेत्र आज खूपच विस्तारलं आहे. या क्षेत्रात दरवर्षी अडीच लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. शहरात होणाऱ्या नवनवीन मॉल्समुळे तयार बाजारपेठही निर्माण होत आहे. फक्त शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही फूड टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. शेतात तयार होणारी फळं, धान्य इत्यादींवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांचं आर्थिक मूल्य वर्धित करणं हे फूड टेक्नॉलॉजीनेच शक्य आहे. उदाहरणार्थ-स्ट्रॉबेरी नुसतीच विकण्यापेक्षा थोडीशी साखर आणि प्रिझव्र्हेटिव्ह वापरून त्याचा जॅम, क्रश किंवा सिरप बनविल्यास तिचं आर्थिक मूल्य कितीतरी पटीने वाढतं. आपल्या शेतांमधल्या फळांवर, अन्नधान्यांवर प्रक्रिया करून असं मूल्य वाढविल्यास ग्रामीण आर्थिक व्यवस्थेवरही त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. कृषिमालावर प्रक्रिया करणारा उद्योग हा भविष्यात वेगाने वाढणारा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा असेल, असं म्हटलं जात आहे. त्यामागे ही सगळी पाश्र्वभूमी आहे. साहजिकच फूड टेक्नॉलॉजी हा करिअरचा चांगला पर्याय ठरू पाहतो आहे.

फूड टेक्नॉलॉजीचे स्वरूप : सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे अन्नावर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ बनवणं हे फूड टेक्नॉलॉजीचं उद्दिष्ट असतं. यात पाच मिनिटांत तयार होणारे भातांचे प्रकार, सूप्स, फळांचे रस, प्रिझव्र्ह केलेल्या भाज्या/फळं, दुग्धजन्य पदार्थ, मटण, चिकन, भाज्यांच्या ग्रेव्हीज अशा नानाविध पदार्थाचा समावेश होतो. फूड टेक्नॉलॉजी उद्योगात धान्याची मळणी, फळं-भाज्यांवरील प्रक्रिया, मांसजन्य पदार्थावरील प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थावरील प्रक्रिया आदींचा समावेश होतो. या फूड प्रश्नेसेसिंग उद्योगामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान तसंच अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांचा समन्वय आवश्यक ठरतो.
या उद्योगात उत्पादन (प्रश्नॅडक्शन) व गुणवत्ता नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) असे दोन विभाग पडतात. उत्पादनाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. अन्नावरील प्रक्रिया ठरवून दिल्याप्रमाणे होत आहे ना, याकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. याशिवाय अन्नावरील प्रक्रिया करत असताना भेसळ होत नाही ना वा अन्नपदार्थ खराब होत नाही ना, हे पाहणं हेही त्यांना करावं लागतं. फूड टेक्नॉलॉजिस्टना साखर, अल्कोहोल, बेकरी, डेअरी, तेल, फळं, भाजीपाला इत्यादी क्षेत्रांत स्पेशलायझेशन करता येतं.
गुणवत्ता नियंत्रणाचं काम केमिस्ट किंवा फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. यात कच्च्या मालाचा दर्जा तपासणं, विक्रीसाठी तयार मालाच्या नमुन्यांची चाचणी घेणं, पॅकिंग तपासणं, कारखान्यात आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणं इत्यादींचा समावेश होतो. या व्यवसायात ऑर्गेनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री तसंच इंजिनीयरिंगच्या विविध शाखांतील तज्ज्ञांची गरज असते.
फूड टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तुलनेने कमी आहेत. बी.एस्सी. (फूड टेक्नॉलॉजी/फूड सायन्स) किंवा बी.ई./बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी/फूड सायन्स) आदी अभ्यासक्रमासंबंधी १२वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक असते. बऱ्याच पारंपरिक विद्यापीठांमधून होम सायन्स हा अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रमदेखील फूड सायन्सशी संबंधितच आहे.
उच्च शिक्षणाबरोबरीनेच अल्प मुदतीचे अनेक अभ्यासक्रम विविध संस्थांमधून चालवले जातात.
अल्पमुदतीचे अभ्यासक्रम : लघुउद्योगसेवा संस्थान, या संस्थेद्वारा ‘अन्न, भाज्या, फळांचे परीक्षण’ या विषयाचं प्रशिक्षण दिलं जातं. पत्ता : लघुउद्योगसेवा संस्थान, अंधेरी-कुर्ला मार्ग, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-७२. दूरध्वनी- ०२२-२८५७६०९०/२८५७७१६६.
खादी व ग्रामोद्योग संस्थान, ग्रामोदय, इर्ला रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ५६, दूरध्वनी- ०२२-२६७१९४६५/ २६७१६३२३ या संस्थेद्वारा महाराष्ट्रामधील विविध केंद्रांमध्ये फळ व भाजीपाला प्रक्रिया, परिरक्षण व कॅनिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. याचप्रमाणे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये फळं परिक्षण, तसेच कॅनिंगचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालवले जातात.
रोजगार संधी- फूड टेक्नॉलॉजीमधील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फूड प्रोसेसिंग कंपन्या, फूड रिसर्च लॅबोरेटरीज, अन्नपदार्थाचे घाऊक व्यापारी, रिटेल उद्योग, हॉटेल, रेस्टॉरंटस्, हॉस्पिटल तसेच अन्य ठिकाणच्या कॅटरिंग उद्योगांमध्ये चांगल्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतात. प्रश्नेसेस्ड फूड उद्योगातील वाव बघून अमूल, नेस्ले, ब्रिटानियासारख्या पारंपरिक कंपन्यांबरोबरीनेच आय. टी. सी. (सनफिस्ट), गोदरेज यांसारख्या अन्य क्षेत्रातील दिग्गज कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत.
विविध सरकारी आस्थापनांमधील फूड डिपार्टमेंटमध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांना इन्स्टिटय़ूट ऑफ फूड सिक्युरिटी, गुरगाव (हरियाणा) येथे प्रशिक्षण देण्यात येतं. केंद्र व राज्य सरकारद्वारे फूड इन्स्पेक्टरची जाहिरात देऊन भरती केली जाते. सरकारतर्फे यांना तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. अन्नपदार्थाच्या उत्पादनाच्या तसंच वितरणाच्या विविध टप्प्यांवर दर्जा तपासणीचं काम फूड इन्स्पेक्टर करतात.
डेअरी टेक्नॉलॉजी - डेअरी टेक्नॉलॉजी ही फूड टेक्नॉलॉजीची एक मह्त्त्वाची शाखा आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात जगातील अग्रगण्य देश आहे. मात्र दुग्ध निर्यातीच्या बाबतीत आपला क्रमांक मागे आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आपण दुग्धजन्य पदार्थाच्या प्रक्रियांकडे लक्ष देण्याचं ठरवलं, तर यातही आपण मानाचं जागतिक स्थान निर्माण करू शकू. भारतात झालेल्या ‘धवलक्रांती’नंतर दुग्धव्यवसाय भरभराटीला आला आहे.
डेअरी टेक्नॉलॉजीत प्रश्नमुख्याने दूध व दही, तूप, पनीर, बटर, चीज, मिठाई, आइस्क्रीम अशा दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीचा समावेश होतो. याशिवाय दूध देणाऱ्या पशु-प्रश्नण्यांचं संगोपन, त्यांचं रोगराईपासून संरक्षण, त्यांच्या वाढीला पोषक पशुखाद्यनिर्मिती इत्यादींचाही समावेश होतो.
अभ्यासक्रम - दुग्धतंत्रशास्त्र पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी) ‘महाराष्ट्र पशु व मत्स्यव्यवसाय विद्यापीठ, नागपूर’शी संलग्न असलेल्या ‘दुग्धशाळा विज्ञान संस्था’ (आरे, गोरेगाव, मुंबई- ६५). या संस्थेत वरील दोन वर्षाचा अभ्यासक्रम चालवला जातो.
पात्रता- बारावी (विज्ञान) शाखेची परीक्षा. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयांसह सरासरी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. (राखीव वर्गासाठी ४५ टक्के).
बी. टेक्. (डेअरी टेक्नॉलॉजी) - नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट, कर्नाल या भारतातील डेअरी टेक्नॉलॉजीमधील अग्रगण्य संस्थेत पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच. डी.पर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. बी. टेक्. (डेअरी टेक्नॉलॉजी) हा चार वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. यासाठी बारावी विज्ञान शाखेतून (पी. सी. एम. व इंग्रजी विषयासह) किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
पत्ता- एन. डी. आर. आय. अभिमत विद्यापीठ, कर्नाल, हरियाणा- १३२००१. दूरध्वनी- ०१८४-२२५२८००/ २२५९००२.
वेबसाइट : www.ndri.nic.in
बी. टेक्. (डेअरी टेक्नॉलॉजी) - ‘महाराष्ट्र पशु व मत्स्यव्यवसाय विद्यापीठ’शी संलग्न असलेल्या ‘कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, पुसद’ येथेही चार वर्षाचा पूर्णवेळ बी. टेक्. अभ्यासक्रम करता येतो. बारावी विज्ञान शाखेतून भौतिक, रसायन, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना येथे प्रवेश दिला जातो. प्रवेशप्रक्रिया बारावीच्या निकालानंतर जूनमध्ये सुरू होते. शेती असणाऱ्यांसाठी प्रवेशाच्या वेळी १२ गुण वाढवून दिले जातात. पत्ता- कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड, पुसद, जिल्हा- यवतमाळ, दूरध्वनी- ०७२३३-२४७२६८/ २४८६९६.
शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य बाजारात दीर्घकाळ टिकवण्याचे काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करत आहेत. या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करण्याच्या संधी कल्पक तरुण-तरुणींना मिळू शकतात. म्हणूनच त्यांनी करिअरच्या या नव्या क्षेत्राचे आव्हान स्वीकारायला हवे.
फूड टेक्नॉलॉजीसंबंधित अभ्यासक्रम व संस्था

दहावीनंतर फूड टेक्नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम पुढील संस्थांमध्ये चालवले जातात -
शासकीय तंत्रनिकेतन, मालवण. दूरध्वनी- ०२३६५-२५२२२३.
प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक, जुहूतारा रोड, सांताक्रूझ (प.),
दूरध्वनी- ०२२-२६६०८६७६.
के. के. वाघ महिला तंत्रनिकेतन, नाशिक, दूरध्वनी- ०२५३-२५१२८६७
वेबसाइट- www.cftri.com
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.

    No comments:

    Post a Comment