| इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर | ![]() | ![]() |
बुधवार, २ सप्टेंबर २००९ आनंद मापुस्कर- फोन : ०२२-३२५०८४८७.मी बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असून मला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे. तरी कृपया मला यातील अभ्यासक्रम व संस्थांची माहिती द्यावी? - प्रियंका राजशिर्के मुंबई व त्यासारख्या इतर मोठय़ा महानगरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. कधी पारितोषिक वितरण समारंभ, तर कधी फॅशन शो. कधी सुप्रसिद्ध गायकाची मैफल तर कधी हस्तकला- प्रॉपर्टीसंबंधी प्रदर्शनं वा पुस्तक प्रदर्शनं होत असतात. व्यापाराच्या दृष्टीने पाहिल्यास हे सर्व कार्यक्रम म्हणजे स्वतंत्र इव्हेंट्स आहेत, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात छोटय़ा-मोठय़ा कौटुंबिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठीही वेळ व मनुष्यशक्ती अपुरी पडत असल्याने लग्न, वाढदिवस वगैरेंसारख्या कार्यक्रमांचंदेखील व्यवस्थापन इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे देण्यात येतं. लग्नाचं व्यवस्थापन (वेडिंग मॅनेजमेंट) ही इव्हेंट मॅनेजमेंटमधील सध्या विशेष शाखा आहे. हा एक नवा प्रकार आता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आला आहे. यामध्ये लग्नाच्या धावपळीतून मुक्तता मिळून घरातील सर्वजण लग्न एन्जॉय करू शकतात. व्यावसायिक जगातील लोकांची गरज मात्र वेगवेगळी असते. या गरजेनुरूप कार्यक्रमाची आखणी करून देणं, हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं काम असतं. इव्हेंटमध्येदेखील विविधता असते. कधी कंपनीचं नवीन उत्पादन पहिल्यांदाच ग्राहकांसमोर आणायचं असतं. याला प्रॉडक्ट लाँचिंग म्हणतात. कधी विशिष्ट स्तरातील लोकांपर्यंत उत्पादन पोहोचवायचं असतं. कधी परिषदांचं आयोजन, तर कधी वार्ताहर परिषदांचं आयोजन करायचं असतं. बहुतेक वेळा कंपनीचे अधिकारी, आपल्या मनातील एखादी अस्पष्ट कल्पना व त्यासाठी असलेलं पैशाचं बजेट सांगतात. इव्हेंट मॅनेजरला या आधारे कार्यक्रमाचं नेमकेपण ठरवायचं असतं. समजा, एखादा चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करायचा असेल, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचं नियोजन करावं लागेल ते पाहू या. ० पुरस्कार निवडण्यासाठी लोकांकडून प्रवेशिका मागवाव्या लागतील. ० पुरस्कार निवडण्यासाठी परीक्षक नेमावे लागतील. ० कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रायोजक शोधावे लागतील. ० प्रत्यक्ष पारितोषिक वितरण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी लागेल. ० निवेदक, पुरस्कार देणारे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे याची निवड करावी लागेल. ० ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, रंगमंच व सेट रचना यांचा विचार करावा लागेल. ० निमंत्रणाची वर्गवारी करून निमंत्रणं पाठवणं व निमंत्रितांची बसण्याची व्यवस्था, याची रचना करावी लागेल. ० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था. ० सुरक्षा व्यवस्था. ० कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची योजना. ० मनुष्यबळाची योजना. ढोबळ मानाने कार्यक्रमाच्या कामांची आखणी केल्यावर लक्षात येईल की, इव्हेंट मॅनेजमेंट हे टीमने करण्याचं काम आहे. यामुळेच या क्षेत्रात टीमवर्कला महत्त्व आहे. या बरोबरीनेच इव्हेंट मॅनेजरच्या नेटवर्किंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये विविध कौशल्यं असणाऱ्या व कामं जाणणाऱ्या माणसांची गरज असते. ज्याचं इतर माणसांशी नेटवर्क चांगलं, तो यामध्ये अधिक यशस्वी होऊ शकतो. या क्षेत्रात नेतृत्वगुण असणं आवश्यक आहे. अनेकजणांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणारे व प्रत्येकाचं वैशिष्टय़ व कमतरता माहिती असणारे यामध्ये यशस्वी होतात. यासाठी अफाट जनसंपर्क असावा लागतो. कधी कधी नियोजन अतिशय चांगलं केलेलं असतं; परंतु एखादी गृहीत न धरलेली घटना घडल्यास काय करायचं? असा प्रश्न उभा ठाकतो. कार्यक्रमाच्या वेळी लाईट गेल्यास वा अवेळी पाऊस आल्यास वा कलाकारांचं येणं ऐनवेळी रद्द झाल्यास काय करायचं? अर्थात, अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीचं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. यामुळेच त्याक्षणी निर्णय घेण्याची क्षमता इव्हेंट मॅनेजमेंटकडे असणं जरुरीचं असतं. तसंच या वेळी आपल्या जनसंपर्काच्या आधारेच आपण आलेल्या आपत्तीवर मात करू शकतो. स्थिर चित्ताने काम करणाऱ्या व्यक्तीच इव्हेंट मॅनेजमेंटचं काम लीलया पार पाडू शकतात. ० इव्हेंटच्या प्रत्येक क्षणी इव्हेंट मॅनेजरला सतर्क राहावं लागतं. ० दिवसाचे १८-१८ तास काम करावं लागतं. ० जबाबदारी झटकून टाकून वा दुसऱ्यावर ढकलून चालत नाही. ० इव्हेंटमध्ये काम करत असताना आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष देणं आवश्यक असतं. कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही. या क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान लोकांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. हे क्षेत्र सतत बदलणारं व थोडी अनिश्चितता असणारं, पण चांगलं अर्थार्जन मिळवून देणारं क्षेत्र आहे. इव्हेंट मॅनेजमेंट अंतर्गत करण्यायोग्य कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम : वाढदिवस, बारसं, भोंडला, मंगळागौर यांसारख्या छोटय़ा कार्यक्रमांचं आयोजन यात येतं. विवाह व्यवस्थापन आपद्ग्रस्त तसंच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं अथवा खेळांच्या सामन्याचं आयोजन करणं. कंपन्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी प्रदर्शनं, जत्रा भरवणं. गणेशोत्सव, नवरात्र आदी सणानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं. म्युझिक शो, मिमिक्री शोचं आयोजन करणं. राजकीय पक्षांच्या सभा, दौरे यांचं नियोजन करणं. मार्केटिंगच्या नवनवीन कल्पना साकार करणं. खेळांच्या स्पर्धाचं आयोजन करणं. कंपन्यांच्या सहली तसंच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं. वीक एण्ड पार्टीजचं आयोजन करणं. विविध कंपन्या, राजकीय नेते यांच्यासाठी जनसंपर्काचं काम करणं. कंपन्यांच्या विविध परिषदा तसंच वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं. चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ. फॅशन शो. फूड फेस्टिवल.या सर्व इव्हेंटस्मध्ये त्यांच्या स्वरूपानुसार कामाचे विविध विभाग पाडले जातात. त्या त्या विभागाचा प्रमुख व त्याच्या टीममध्ये आवश्यकतेनुसार माणसं जोडली जातात. प्रत्येक विभागामध्ये करायचं काम व हाताशी असलेला कालावधी लक्षात घेऊन कामाचं वेळापत्रक तयार केलं जातं. रोजच्या रोज कामांचा आढावा घेतला जातो. सर्व विभागांचे प्रमुख मुख्य संयोजकाला रिपोर्टिग करतात. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक कार्यक्रमाची जागा व कार्यक्रमाची रूपरेषा नक्की करतात व नंतर जबाबदाऱ्यांचं विभागवार वाटप केलं जातं. सर्वसाधारण जबाबदाऱ्या प्रसिद्धी : यामध्ये कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध प्रसारमाध्यमांचा (टी.व्ही., वर्तमानपत्रं, रेडिओ) वापर केला जातो. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स, होर्डिग्ज लावणं, घरोघरी पत्रकं वाटणं, तसंच कार्यक्रमाची वेबसाइट तयार करणं आदी गोष्टी करण्यात येतात. अर्थ (फंड) : यामध्ये कार्यक्रमाचा खर्च कोणकोणत्या माध्यमातून गोळा करण्यात येईल, याचा विचार होतो. त्याप्रमाणे प्रायोजक व जाहिराती मिळवल्या जातात. तसंच प्रदर्शनांमध्ये स्टॉलदेखील आणावे लागतात. अकाऊंट्स : दिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवणं तसंच व्हाऊचर्स व पावत्या नीट ठेवणं. कार्यक्रमानंतर ऑडिट सादर करणं हे याचं काम असतं. मनुष्यबळ : विविध विभागात आवश्यक असणारी माणसं पुरवणं हे यांचं काम असतं. कार्यक्रम संयोजन : मुख्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, मंचावरील सर्व बाबींचं नियोजन याला करावं लागतं. बैठक व्यवस्था : कार्यक्रमाच्या ठिकाणची प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करणं. खाण्याची व्यवस्था : कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणं. सुरक्षा व्यवस्था : कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना, कलाकारांना सुरक्षित ठेवणं तसंच कार्यक्रमामध्ये गडबड होणार नाही, चोरी होणार नाही, याची जबाबदारी या विभागावर असते. परवानगी : मोकळ्या मैदानावर कार्यक्रम करण्यासाठी राज्य सरकार, अग्निशमन दल, पोलीस तसंच महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून अनेक परवानग्या आणणं हे त्यांचं काम असतं. कायदेविषयक व्यवस्थापन : कार्यक्रम कोणत्याही कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये, यासाठी काळजी घेणं हे या विभागाचं काम असतं. वाहन/वाहनतळ व्यवस्था : कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वाहनांचं व कार्यक्रमाला आलेल्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था यांना करावी लागते. कार्यक्रमानुसार कामाचे विभाग कमीअधिक होतात. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सामूहिकतेला महत्त्व अधिक असतं. इव्हेंट मॅनेजरचे गुण उपजत अनेकांमध्ये असतात. आप्तेष्टांच्या कोणत्याही कार्यक्रमात इव्हेंट मॅनेज करणारे नारायण अनेक ठिकाणी आढळतात. सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवामध्येदेखील असेच हौशी इव्हेंट मॅनेजर वस्ती पातळीवर काम करीत असतात. या तरुणांनी आपल्या याच कसबाकडे व्यावसायिक दृष्टीने बघितल्यास अनेक यशस्वी इव्हेंट मॅनेजर यामधून मोठी करिअरभरारी घेतील. अभ्यासक्रम इव्हेंट मॅनेजमेंटसाठी विविध अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांबरोबरीने आपल्या शाळेतील, महाविद्यालयातील किंवा परिसरातील विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सहभागी होऊन आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटमधील करिअरची सुरुवात करता येईल. मोठय़ा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये किंवा मोठय़ा वृत्तसमूहात वरिष्ठ पदावर जायचं असल्यास पदवीनंतर एम.बी.ए. करणं योग्य ठरेल. इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, आय.ई.एस. मॅनेजमेंट कॉलेज, चौथा मजला, लीलावती हॉस्पिटलसमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूरध्वनी : ०२२-२६५५१४१४/१७१७ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, एस.एन.डी.टी. कॉलेज, जुहू कॅम्पस, तारा रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००४९. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, नंदनवन बिल्डिंग, तळमजला, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दूरध्वनी : ०२२-२६२८२९२८. नॅशनल स्कूल ऑफ इव्हेंट्स, सूरज प्रीमायसेस, पहिला मजला, राम मारुती रोड, ठाणे (पश्चिम)-४००६०२. दूरध्वनी : ०२२-२५३९३१३०/ ३२६९९९७५. |


आनंद मापुस्कर- फोन : ०२२-३२५०८४८७.
कौटुंबिक कार्यक्रम : वाढदिवस, बारसं, भोंडला, मंगळागौर यांसारख्या छोटय़ा कार्यक्रमांचं आयोजन यात येतं.
No comments:
Post a Comment