Wednesday, September 9, 2009

सागराच्या अंतरंगात.. Print E-mail
बुधवार, ९ सप्टेंबर २००९
सचिन जगदाळे - sachin.jagdale28@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it (९८६९२३२२६९)
अनादी काळापासून मानव मत्स्य व अन्य सागरी-संपत्ती उपसत आला आहे. सध्या सागरातील मत्स्य संख्या कमी होत आहे. ती मत्स्य संपत्ती व तिचे वैविध्य टिकवले जाणे काळाची गरज बनली आहे. दुसऱ्या बाजूला सध्या जागतिक संकट बनलेल्या ‘ग्लोबल वॉर्मिग’चा परिणाम कमी करण्यास सागरातील जैविक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याचा उणा-पुरा अभ्यास करणाऱ्या ‘ओशनोग्राफी’ची आवड तरुणांमध्ये करिअरच्या दृष्टीने निर्माण होणे अत्यावश्यक आहे. अशा या दुर्लक्षित अभ्यासविषयाबाबत ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’चे संचालक डॉ. बाळासाहेब गो. कुलकर्णी यांच्याशी झालेला वार्तालाप..
करिअरच्या दृष्टिकोनातून ओशनोग्राफीची पदवी कशी उपयुक्त आहे?
भारताला ८०१४ किमी लांबाचा प्रदीर्घ सागरकिनारा लाभला आहे, पण ओशनोग्राफी किंवा सागरशाळा विषयाची प्रगती आपल्याकडे विशेष घडली नाही. भारतात अद्यापही ओशनोग्राफी बाल्यावस्थेत आहे, असे म्हटल्यास वावगे नाही. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर 720 कि.मी. सागरकिनारा असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही ओशनोग्राफीचे अभ्यासक्रम शिकवणारे एकही विद्यापीठ किंवा संस्था सध्या उपलब्ध नाही. अशा स्थितीत ओशनोग्राफीमधील पदवी करिअरच्या दृष्टीने आपल्याकडे एवढी उपयुक्त नसली तरी प्रगत देशांत या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहे. भारतात नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (NIO), सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन(CIFE), सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट (MCFRI) या संस्थेत तसेज दक्षिण राज्यातील काही विद्यापीठात संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात ओशनोग्राफी पदवीधारकांना संधी उपलब्ध आहे. याशिवाय मरिन इंजिनीअरिंग क्षेत्रात तर करिअरच्या दृष्टीने खूप मोठा वाव आहे. खाजगी तसेच काही विद्यापीठातून मरिन बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रही करिअरच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
ओशनोग्राफीच्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पात्रतेचे नियम कुठले?
महाराष्ट्रात काय किंवा भारतातील विशेषत: समुद्रकिनाऱ्यावरील राज्यातील विद्यापीठात ओशनोग्राफीला पदवीस्तरावरील कोणताही अभ्यासक्रम उपलब्ध नाही पण पदव्युत्तर (Post graduate) अभ्यासक्रम मात्र या विद्यापीठात कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ओशनोग्राफीचा विशेष अभ्यासक्रम आहे. त्यासाठी प्राणिशास्त्र विषयातील पदवीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. तर काही विद्यापीठात एम. एस्सी. मरिन सायन्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेसाठी साधारणपणे सायन्स पदवीधारक अर्ज करू शकतात. सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीजमध्ये B.F.Sc. अर्थात फिशरीज सायन्समधील पदवीचा अभ्यासक्रम असून यासाठी बारावीनंतर प्रवेश दिला जातो. तसेच नागपूर येथील महाराष्ट्र पशू संवर्धन व मत्स्य विद्यापीठात व कोकणातील दापोली येथील कृषी विद्यापीठात B.F.Sc. या पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीनंतर प्रवेश मिळतो. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशासाठी B.F.Sc. या धारकांना प्रवेश मिळतो. CIFE मधील B.F.Sc व M.F.Sc या अभ्यासक्रमात ओशनोग्राफीतील बऱ्याच विषयांचा समावेश होतो.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर ओशनोग्राफी या अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था कुठल्या?
महाराष्ट्रात सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) जी मुंबईच्या वर्सोवा भागात कार्यरत आहे. या संस्थेचे आता विद्यापीठात रूपांतर झाले असून येथे फिशरीज सायन्सचा पदवीचा अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमात फिशरीजमधील सर्व विषयांचा अंतर्भाव आहे. याव्यतिरिक्त नागपूरच्या विद्यापीठातूनही B.F.Sc व M.F.Sc हे अभ्यासक्रम राबवले जातात पण ओशनोग्राफीचे अभ्यासक्रम ज्यात रासायनिक, भौतिक, जैविक व भूर्गभशास्त्रीय ओशनोग्राफीचा समावेश होतो, असा एकही अभ्यासक्रम महाराष्ट्रात उपलब्ध नाही ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. महाराष्ट्राशिवाय गोवा, कोचीन, कोलकाता, चेन्नई व हैदराबाद विद्यापीठात ओशनोग्राफीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. याबद्दलची माहिती सोबतच्या तक्त्यात पाहता येईल. हैदराबाद तसेच कोलकाता येथील विद्यापीठात सागरी जीवशास्त्र विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीत सागरशास्त्रातील विविध विषयांवर Ph.D. साठी प्रवेश दिला जातो. NIO मधून सागरशास्त्रातील Ph.D. चा अभ्यासक्रम करताना विद्यावेतनाचीही सोय आहे. चेन्नईच्या NIOT नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनो टेक्नॉलॉजीत सागर शास्त्रातील विशेषत: भौतिक सागरशास्त्र विषयात संशोधनाची संधी उपलब्ध आहे.
ओशनोग्राफीच्या पदवीधरासाठी विदेशात रोजगाराच्या कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे?
ओशनोग्राफीत ज्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधन केले आहे अशा तरुणांसाठी भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध आहे. सध्या अंटार्टिकावर प्रगत राष्ट्र संशोधन प्रयोगशाळा उभारत आहेत. अंटार्टिकावर दरवर्षी संशोधन मोहिमा निघतात. अशा संशोधन मोहिमेत ओशनोग्राफीतील पदवीधारक भाग घेऊ शकतात. तसेच अमेरिका व युरोपातील सर्व देशात सागरशास्त्रात संशोधन राबवणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. अशा प्रयोगशाळांतून संशोधन कार्यात सहभागी होण्याची संधी आहेत. याशिवाय परदेशातील विद्यापीठात सागरशास्त्रविषयक अनेक अभ्यासक्रम राबवले जातात व संशोधन केले जाते. त्यामुळे अशा शैक्षणिक व संशोधन कार्यातही संधीला वाव आहे. सागरी जीव तंत्रज्ञान अर्थात मरीन बायो टेक्नॉलॉजीतही विद्यार्थी करियर करू शकतात. एकंदरीत पाहता ओशनोग्राफीतील पदवीधारकांना भरपूर प्रमाणात परदेशात संधी उपलब्ध आहेत.
ओशनोग्राफीच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा याकरता शैक्षणिक संस्थांनी कुठली पावले उचलली पाहिजेत?
महाराष्ट्र तसेच भारतातील सागरी राज्यातील विद्यापीठानी सागरशास्त्राचे विविध अभ्यासक्रम राबविले पाहिजेत. सागरी रसायनशास्त्र, सागरी भौतिक शास्त्र तसेच भूगर्भशास्त्राचे खास अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. मुंबई विद्यापीठाला १५० वर्षे पूर्ण झाली तरी ओशनोग्राफीतील परिपूर्ण असा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने अद्यापही सुरू केला नाही ही खेदाची बाब आहे. मुंबई विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयात एम.एस्सीला ओशनोग्राफीचा अभ्यासक्रम आहे त्यात विशेष काही बदल झालेला नाही. सागरातील संपत्ती कशा प्रकारे मिळविता येईल याकडे लक्ष देण्यासाठीही अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत. तसेच सागरातील प्रदूषणाचा अभ्यास व प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना वरही अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठातून सुरू झाले पाहिजेत. मानवाच्या उदयापासून मानव सागरातून मत्स्य संपत्ती उपसत आला आहे त्यामुळे सध्या सागरातील मत्स्य संख्या कमी होत आहे याचा अभ्यास करण्यासाठी तसेच आहे ती मत्स्य संपत्ती कशी टिकेल याचाही अभ्यासक्रमात विचार झाला पाहिजे. ओशनोग्राफीची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमातही सागराच्या अंतरंगाची ओळख करून देण्याविषयी प्रयत्न झाले पाहिजेत.
ओशनोग्राफीच्या अभ्यासक्रमाच्या प्रसारासाठी शासनाकडून कुठल्या प्रकारच्या सहकार्याची/ निर्णयाची अपेक्षा आहे.
भारत सरकारने महासागर विकास विभाग सुरू करून २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या विभागातर्फे भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या सागराची विविध प्रकारे काळजी घेतली जाते. या विभागातर्फे सागराच्या अभ्यासाच्या मोहिमा घेतल्या जातात. तसेच विद्यापीठातील व संशोधन प्रयोगशाळांतील संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाला सागराच्या विविध अंगांचा अभ्यास करण्यासाठी भरीव अनुदान दिलं जाते. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे सागरी राज्यात खास विभाग या राज्यातील विद्यापीठातून राबवले जातात. पण यातील एकही केंद्र महाराष्ट्रात नाही हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. सागराच्या अभ्यासक्रमात मराठवाडय़ातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद ने मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील रत्नागिरीत एक संशोधन प्रयोगशाळा सुरू केली आहे. या प्रयोगशाळेद्वारे महाराष्ट्राच्या सागर किनारपट्टीचा जैविक अभ्यास विशेष केला जातो.
अशा प्रकारची प्रयोगशाळा मुंबई विद्यापीठाने सुरू केली पाहिजे. सागरातील संशोधन मोहिमेसाठी लागणाऱ्या बोटी फक्त भारत सरकारच्या महासागर विभागाकडे आहेत तसेच भारतीय मत्स्य संस्थेकडे आहेत. पण त्या बोटीतून समुद्रावर संशोधन करण्याची संधी मिळणे विद्यापीठातील संशोधकाना सहज शक्य होत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) च्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी ही संस्था सुरू करावी व या संस्थेद्वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा सर्वतोपरी अभ्यास करावा, जेणेकरून समुद्रातील संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग सर्वाना होईल. महाराष्ट्र शासनाने सागरात संशोधन करणाऱ्या बोटीची उपलब्धता शासनाच्या विज्ञान संस्थेस करून द्यावी. तसेच मरीन बायोटेक्नॉलॉजी अर्थात सागरी जीवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रमही विद्यापीठातून राबवण्यास सुरुवात करावी. महाराष्ट्र शासनातर्फे मत्स्य विद्यापीठ रत्नागिरीस स्थापन करण्याबाबत वर्तमानपत्रातून जाहीर केले होते, पण मला वाटते मत्स्य विद्यापीठापेक्षा रत्नागिरीला महाराष्ट्र शासनाने वॉशिग्टन येथील इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीच्या धर्तीवर एक ओशनोग्राफी विद्यापीठ सुरू करावे.
सध्याच्या ग्लोबल वॉर्मिगच्या समस्येतला समुद्र एक महत्त्वाचा घटक आहे. या संकटावर मात करण्यासाठी ओशनोलॉजिस्टची भूमिका काय असेल?
ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम कमी करण्यासाठी सागरातील जैविक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वातावरणातील कार्बन डॉयऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिग अर्थात जागतिक पातळीवर तापमान वाढत आहे. सागराद्वारा वातावरणातील कार्बन डॉयऑक्साईड मोठय़ा प्रमाणात शोषला जात असल्याने वातावरणातील कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण कमी राहते. समुद्रातील शैवालद्वारा प्रकाश संश्लेषणाची (Photo Synthesis) मोठय़ा प्रमाणात कार्बन डॉयऑक्साईड लागतो. तसेच समुद्रप्राण्याच्या अंगावर कठीण कवच असते. त्यासाठी कार्बनचा उपयोग केला जातो, अशा प्रकारच्या जैविक क्रियासाठी वातावरणातला कार्बन डॉयऑक्साइड समुद्रात शोषला जातो, पण सध्या समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे पाण्यात कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण वाढते राहिल्याने वातावरणातील कार्बन डॉयऑक्साइड जास्त प्रमाणात समुद्रातून शोषला जात नाही. परिणामी ग्लोबल वॉर्मिगची तीव्रता वाढू लागली आहे. या प्रक्रियेत ओशनोलॉजिस्ट महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना ओशनोलॉजिस्टने शोधल्यास नक्कीच समुद्र द्वारे कार्बन डॉयऑक्साईडच्या शोषणाच्या प्रमाणात वाढ होऊन ग्लोबल वॉर्मिगची तीव्रता कमी होईल. एकंदरीत ओशनोलॉजिस्टद्वारा समुद्रातील जैविक, रासायनिक व भौतिक प्रक्रियांचा अभ्यास केला जाऊन बिघडलेल्या प्रक्रियांत सुधारणा केली जाऊ शकते.
सध्या ओशनोग्राफी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही काय सल्ला द्याल?
प्रथम ओशनोग्राफीला घेतलेला अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे अभ्यास करून पूर्ण करा. सागरात घडत असलेल्या सर्व प्रकारच्या प्रक्रियांची माहिती व्यवस्थित करून घ्या. तसेच ओशनोग्राफीतील एखादा खास विषय निवडून त्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न करा. आता तर भारत सरकारतर्फे राबवत असलेल्या अंटाक्र्टिका मोहिमात तरुणांनाही सहभागी होता येते. ओशनोग्राफीतील अंटार्टिकावर शक्य असलेला संशोधन प्रकल्प सादर करून या मोहिमेत सहभागी होता येते. आपणास कोणी सांगत असेल ओशनोग्राफीत काही करिअर नाही तर त्याकडे दुर्लक्ष करा. स्वत:च विषयातील रस जिवंत ठेवल्यास ओशनोग्राफीत करिअर केल्याचा आपणाला नक्कीच अभिमान वाटेल असे मी खात्रीने सांगतो.

‘ओशनोग्राफी’चा अभ्यासक्रम उपलब्ध असणारी विद्यापीठे व त्यांचे संकेत स्थळ
१) गोवा विद्यापीठ http://www.unigoa.ac.in
१. ‘एम.एस्सी. इन मरीन सायन्स’ यात मरीन सायन्स, जीवशास्त्र व मरीन भूगर्भशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
२) एम.एस्सी. इन मरीन बायोटेक्नॉलॉजी
३) एम.फिल. इन सागरी प्राणीशास्त्र
४) पी.एचडी. इन मरीन सायन्स

२) कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ http://www.cusat.ac.in
या विद्यापीठात ट.रू. अभ्यासक्रम खालील विषयात आहेत.
१) भौतिक सागरशास्त्र २) पाणी रसायनशास्त्र ३) सागरी भूगर्भशास्त्र ५) औद्योगिक मत्स्यशास्त्र.
येथे प्रवेशासाठी निवड परीक्षा घेतली जाते.

३) मद्रास विद्यापीठ http://www.unom.ac.in
येथे महासागर व सागर किनारा शास्त्रातील ट.रू. अभ्यासक्रम राबविला जातो.

४) बेहरामपूर विद्यापीठ, ओरिसा http://www.bamu.ac.in
येथे सागरी जीवशास्त्र तसेच सागरशास्त्रातील ट.रू. चा अभ्यासक्रम कार्यरत आहे.

५) सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज एज्युकेशन (CIFE)
येथे मत्स्यशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम असून सागरशास्त्रातील अनेक अभ्यासक्रम या विद्यापीठातून राबवले जातात.

No comments:

Post a Comment