करिअर सल्ला आवाज की दुनिया! मी कला शाखेचा विद्यार्थी आहे. मला आवजामधील (व्हॉइस अॅक्टिंग) विविध करिअर्सची माहिती द्यावी? - विशाल गायकवाड ‘गुड मॉर्निग मुंबई!’ लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातल्या आर. जे. जान्वहीचं हे मनमोकळं गुडमॉर्निग अजून अनेकांच्या लक्षात असेल. आपल्या आवाजाचा प्रभावी उपयोग करून त्यातून विविध भावनाविष्कार प्रकट करणे म्हणजे ‘व्हॉइस अॅक्टिंग’ ज्यांना आवाजाची देणगी आहे त्यांच्यासाठी हे आकर्षक व आव्हानात्मक क्षेत्र आहे. आज कितीतरी आवाज दिवसभर आपलं
मनोरंजन करत असतात. कधी कार्टून्सना दिलेल्या संवादांतून, तर कधी जाहिरातींच्या जिंगल्समधून! ‘व्हॉइस अॅक्टिंग’चं क्षेत्र आज बरंच विस्तारलंय आणि तरुणांना या क्षेत्रातली आव्हानं खुणावू लागली आहेत. व्हॉइस अॅक्टिंगचं क्षेत्र अनेक प्रगत देशांमध्ये बऱ्यापैकी सुस्थिर झालं आहे. रेडिओवरून बिनाका गीतमाला सादर करणाऱ्या अमीन सयानी यांच्या आवाजाची आठवण आजही अनेकांना येते. आकाशवाणीचे सूत्रसंचालक व कलाकार तसेच दूरदर्शनवरील निवेदक आणि बातम्या सांगणारे हेही व्हॉइस अॅक्टरच आहेत. मनोरंजन उद्योगामध्ये आज क्रांती झाली आहे. रेडिओ चॅनल्स, टीव्ही चॅनल्स, चित्रप, जाहिराती यात प्रचंड वाढ झाली आहे व त्याबरोबर व्हॉइस अॅक्टिंगच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत. डिस्कवरी, हिस्टरी, नॅशनल जिओग्राफिक, पोगो, कार्टून नेटवर्कसारख्या चॅनल्सवरील कार्यक्रमातील डबिंग, नॅरेशन हे व्हॉइस अॅक्टिंगचाच भाग आहेत. मिकी माऊस, डोनाल्ड इकसारखी कार्टून पात्रं आज हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये चपखल बसवण्याचं काम हे व्हॉइस अॅक्टर्समुळेच शक्य झालं आहे. हम है लाजवाब (इनक्रेडिबल्स) या मूळ इंग्रजी अॅनिमेशनपटातील प्रमुख पात्राला बॉलीवुडची धडकन असलेल्या शाहरूख खानने आपला आवाज दिलाय. व्हॉइस अॅक्टिंगची आजच्या काळातील महती यावरून लक्षात येते. व्हॉइस अॅक्टर म्हणून करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रांत संधी आहेत. त्यापैकी काही क्षेत्रांची माहिती घेऊ या. अॅनिमेशन कार्टून चॅनलची संख्या दिवसागणिक वाढते आहे. मुलांबरोबरीनेच मोठी माणसंदेखील कार्टून्सच्या दुनियेत हरवून जातात. कार्टून पात्रांचा आवाज आपल्याला मोहून घेणारा असतो. हा आवाज देण्याचं काम व्हॉइस अॅक्टरचं असतं. जंगलबुक या अॅनिमेशनपटातील शेरखान या पात्राला नाना पाटेकर यांनी आवाज दिला होता. मिकी डोनाल्डसारख्या पात्रांना अनेक वर्षांपासून बघणाऱ्यांना त्यांच्या आवाजात कधीही बदल झालेला जाणवत नाही. त्यांना आवाज देणारे व्हॉइस अॅक्टर्स बदलले, तरी पात्रांचा आवाज तोच राहतो. आवाजाचा नेमकेपणा टिकवण्याचं अत्यंत कौशल्याचं काम व्हॉइस अॅक्टर्सना निभावून न्यावं लागतं. भारतीय पौराणिक घटना, लोककथा, पंचतंत्र आदींवर आधारित अॅनिमेशन मालिकादेखील बनत आहेत. त्याचप्रमाणे हनुमानपासून पूर्ण लांबीच्या अॅनिमेशनपटांची निर्मितीदेखील सुरू झाली आहे. त्यामुळे व्हॉइस अॅक्टर्सची अॅनिमेशन क्षेत्रातील मागणी वाढत राहणार आहे. डबिंग भारतासारखं बहुभाषिक मार्केट लक्षात घेऊन अनेक इंग्रजी कार्टून्सनी तसेच हॉलीवूडपटांनी हिंदीची शिकवणी सुरू केली आहे. मूळ इंग्रजी कार्टून्स हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याची सुरुवात झाली आहे. मूळ पात्राचा आवाज, पोत, स्टाईल ध्यानात घेऊन तशाच प्रकारचा आवाज, अन्य भाषांतील डबिंगमध्ये देऊ शकणाऱ्या व्हॉइस अॅक्टर्सना प्रचंड मागणी आहे. इंग्रजी वा अन्य परदेशी भाषांतील चित्रपट हिंदी किंवा प्रादेशिक भाषांत डब करताना चित्रपटातील अभिनेत्याला व त्याच्या भूमिकेला साजेसा आवाज देणं, हे व्हॉइस अॅक्टर्सचं काम असतं. मूळ चित्रपटातील संवादातील ओठांच्या हालचालींशी ताळमेळ साधत ही कसरत करण्याचं काम आव्हानात्मक असतं. नॅरेशन हिस्ट्री चॅनेलवरील बायोग्राफी कार्यक्रमातून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं चरित्र तासाभराच्या कार्यक्रमात आपल्यासमोर उलगडतं. त्या व्यक्तीविषयी पडद्यामागे राहून संपूर्ण कार्यक्रमभर आपल्याशी संवाद साधणारा निवेदक, हादेखील व्हॉइस अॅक्टरच असतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील नाजूक प्रसंग सांगताना हळुवार होणारा आवाज, आव्हानात्मक प्रसंग सांगताना गंभीर होणारा आवाज अशा प्रकारे हा व्हॉइस अॅक्टर पडद्यामागून अभिनयच करत असतो. रेडिओ आकाशवाणीबरोबरीनेच खासगी एफ. एम. रेडिओ, वर्ल्डस्पेस रेडिओ आदींमुळे रेडिओचे क्षेत्रदेखील विस्तारत आहे. आकाशवाणीवर पूर्वी नवी-जुनी गाणी, बातम्या, नभोनाटय़, शास्त्रीय संगीत आदी मर्यादितच कार्यक्रम असत. तसंच प्रसारणाची वेळही मर्यादित होती. खाजगी एफ. एम. रेडिओ चॅन्लसमुळे मात्र या माध्यमाला नवचैतन्य प्राप्त झालं आहे. कार्यक्रमांमध्ये नावीन्य आलंय. कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष ऐकणाऱ्यांचा सहभाग वाढला, विविध स्पर्धा व बक्षिसं आली. यातूनच या सर्वाचा सूत्रधार असणाऱ्या रेडिओ जॉकीचा उदय झाला. त्या त्या रेडिओ जॉकीचे कार्यक्रम सादर करण्याचं कौशल्य, ढब, ज्ञान, संवादांची पद्धत यामुळे चाहते तयार होऊ लागले आहेत. रेडिओ जॉकी बनण्यासाठी आवाजावर व उच्चारावर प्रभुत्व असायलाच हवं. पण त्याबरोबरीनेच, प्रसंगावधानता, चांगला शब्दसंग्रह, सृजनशीलता (क्रिएटिव्हीटी), उत्स्फूर्तता व आत्मविश्वास आदी गुण आवश्यक ठरतात. निवेदन संगीतरजनी, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ, प्रकाशन समारंभ, मान्यवरांच्या मुलाखती यांसारख्या कार्यक्रमांमध्ये निवेदकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. कार्यक्रमाला एका सूत्रात बांधण्याचं अवघड काम त्याला करायचं असतं. एखादी मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला खुलवावं लागतं. त्यामुळेच मुलाखत व कार्यक्रम रंगतदार करण्याचं काम हे निवेदकाचं असतं. सुधीर गाडगीळ, मंगला खाडिलकर आदी मान्यवरांचा असा वाचिक अभिनय आपण अनेकदा अनुभवला आहे. निवेदनासाठी चांगल्या आवाजाबरोबरीनेच शब्दावर जोर कुठे द्यायचा, कुठे विराम घ्यायचा हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. बोलण्याच्या लयीवर लक्ष देणंही आवश्यक असतं. उत्तम पाठांतर व चांगलं वाचन असावं लागतं. ध्वनिक्षेपकाच्या तंत्रने बोलण्याचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. बोलण्यात पुस्तकी छापीलपणा न येता सहजता आणणं जरुरीचं असतं. व्हिडिओ गेम्स व्हिडिओ गेम्समध्ये सूचना तसंच पात्रांचे संवाद असतात. यासाठीही व्हाइस अॅक्टर्सची गरज असते. जाहिरातीचे क्षेत्र जाहिरातीमध्ये निवेदन तसंच जिंगल्स गाण्यासाठीही व्हाइस अॅक्टर्सना मागणी असते. या बरोबरीनेच प्रमोशनल व्हिडीओ, सेल्स प्रेझेंटेशन, राजकीय प्रचाराच्या कॅसेटस् आदींमध्येदेखील व्हाइस अॅक्टर्सना कामाच्या संधी आहेत. मिमिक्री दी ग्रेट इंडियन लाफ्टर चॅम्पियन या कार्यक्रमामुळे मिमिक्री कलावंतांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. आवाजातील बदलांतून, प्रसिद्ध व्यक्तींच्या नकलांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, हाही व्हाइस अॅक्टिंगचाच प्रकार आहे. प्रशिक्षण संस्था व्हाईस अॅक्टिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही संस्था :- अॅकॅडमी ऑफ डिजिटल आर्टस् कम्युनिकेशन, किलिक इस्टेट, बाजी पासलकर मार्ग, चांदिवली, मुंबई- ७२. www.killickchallenger.com बर्डस् अॅण्ड व्हाइसेस, दारा कॉट्रॅर्क्स कॉलनी, अंधेरी (प.), मुंबई- ५८. स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अॅण्ड कम्युनिकेशन, १०८, इमारत क्र. ४, कामधेनू कॉम्प्लेक्स, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई- ५३. www.sbc.ac.in झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स, झेविअर्स कॉलेज, धोबी तलाव, मेट्रो सिनेमासमोर, मुंबई. दूरध्वनी- २२७०४१८१/ २२६२०४५१. झी अॅकेडमी ऑफ मीडिया आर्टस्, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, अंधेरी (प.), मुंबई- ५३. फिल्मसिटी मीडियाज इन्क., सत्यम शिवम स्टुडिओज, प्लॉट नं. १३६, जानकीदेवी पब्लिक स्कूल रोड, वर्सोवा. टेलिफोन एक्स्चेंजजवळ, म्हाडा, चार बंगला, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई- ५३. दूरध्वनी- ०२२-२६३५४९२०. व्हाइस अॅक्टर म्हणून करिअर करण्यासाठी चांगला आवाज, सुस्पष्ट उच्चार, अनेक भाषांचं, त्यातील लकबींचं ज्ञान, निरीक्षणक्षमता, उत्स्फूर्तता हे गुण आवश्यक आहेत. अभिनयाचं अंग असल्यास उत्तम. या क्षेत्राभोवती प्रसिद्धीचं वलय व पैसा वाढत आहे. आनंद मापुस्कर फोन : ०२२-३२५०८४८७. |
No comments:
Post a Comment