Friday, October 2, 2009

प्रसार माध्यमामधील आव्हानात्मक करिअर!PrintE-mail
बुधवार, ३० सप्टेंबर २००९
सुहास कदम - suhaskadam11@yahoo.in
प्रसार माध्यमांची ताकद किती प्रचंड असते, याची खरंतर सर्वाना चांगलीच कल्पना आहे. प्रसार माध्यम किंवा सध्याच्या भाषेत म्हणायचे झाले तर मास मीडियामध्ये वर्तमानपत्र, विविध विषयांवरील जर्नल्स, नियतकालिके, मॅगेझीन्स, रेडिओ आणि टेलिव्हिजन या सर्वाचाच समावेश होतो. आपल्या देशांतर्गत व देशाबाहेर काय काय घडामोडी चालू आहेत हे समजण्यासाठी व जनतेत त्याबद्दल जाणीव-जागृती निर्माण होण्यासाठी, ज्ञान व मनोरंजन या दोन्हींची भूक भागविण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता आहेच आहे. आपल्या भारतासारख्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही तत्त्वांचा अंगीकार केलेल्या राष्ट्रामध्ये तर प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा आत्माच आहेत.
मास मीडियामधील करियर म्हणजे एक अत्यंत आकर्षक आणि त्याच बरोबरीने आर्थिक स्थैर्य व कामातील समाधान या दोहोंच्या अनुषंगाने उत्तम भविष्य असणारे करियर आहे. नवनवीन बातम्या, चालू घडामोडी आणि मनोरंजन अशा सर्वच स्वरूपाच्या गोष्टी सातत्याने या क्षेत्रात अनुभवायला मिळत असतात. तुम्हाला मिळालेल्या नैसर्गिक गुणांचा, बुद्धिमत्तेचा वापर करून या क्षेत्रातील अनेक पायऱ्या तुम्ही वर चढून जाऊ शकता व शिखरावर पोहोचू शकता. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती, योग्य शिक्षण-प्रशिक्षण व व्यावसायिक कौशल्य या घटकांची. या क्षेत्रातील काम म्हणजे तुमच्यातील सृजनशीलतेला व कल्पनाशक्तीला सतत उपलब्ध असणारी संधी. एकदा का तुम्ही येथे पाऊल ठेवले व स्वत:ची क्षमता व कर्तृत्व सिद्ध केले की, विविध अधिकारांची पदे तुम्हाला या क्षेत्रात मिळत जातात.
बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर, संगणकीय जाळ्याच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीबरोबर स्वत:ला सोबत ठेवणारे, लवचिक शरीराचे अन् मनाचेदेखील, म्हणजेच निर्णयक्षम कर्मचाऱ्यांची आज या उद्योगांना आवश्यकता आहे. प्रसार माध्यमातील कोणताही विभाग ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची आवड आहे जसे की, प्रेस, टेलिव्हिजन, रेडिओ, मल्टिमीडिया या सर्वच विभागांमध्ये, विशेषत: प्रॉडक्शन, डेव्हलपमेंट, सेल्स यांसारख्या विभागांमध्ये तर असंख्य संध्या उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे संभाषण कौशल्य आणि आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक विचार करण्याची क्षमता असेल तर या क्षेत्रातील करियर नक्कीच तुमच्यासाठी आव्हानात्मक व सन्मान बहाल करणारे ठरेल.
मास मीडियामध्ये प्रामुख्याने खालील क्षेत्रांचा उल्लेख करता येईल.
(१) जाहिरात क्षेत्र : ‘जो दिखेगा वो बिकेगा’ यानुसार जाहिरात म्हणजे काय तर, एका विशिष्ट समूहाला लक्ष्य करून त्यांना माहिती देण्याच्या उद्देशाने किंवा एखाद्या उत्पादनाची वा सेवेची माहिती देऊन त्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने किंवा एखादी कृती करण्याच्या उद्देशाने किंवा जाहिरातीत दाखविलेल्या कल्पना, व्यक्ती, ट्रेडमार्कस् वा संस्था यांच्याबद्दल विचार करावयास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने जे दृश्य व मौखिक स्वरूपातील निवेदन लिखित स्वरूपात वा ध्वनिमुद्रित वा चित्रित करून ते या समूहापर्यंत पोहोचविणे म्हणजेच जाहिरात होय. सध्या अत्यंत मागणी असणारे असे हे क्षेत्र आहे. साहजिकच करियरसाठी विपुल संधी असलेले हे क्षेत्र आहे.
बारावीनंतर जाहिरात क्षेत्रातील विविघ अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे-
१) अ‍ॅकॅडमी ऑफ डिजिटल आर्टस् आणि कम्युनिकेशन, बांद्रा (प.) (फोन नं. २६४९०१३०)/ घाटकोपर (पू.) (फोन नं. २५१४००३३) येथे सर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅडव्हर्टायझमेंट उपलब्ध आहे.
२) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई-४०००९८. (फोन नं. २६५२८२२९, २६५२६०९१) येथे डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग हा कोर्स उपलब्ध आहे.
३) एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, आदर्शनगर, वरळी, मुंबई-४०००२५ (फोन नं. २४२२३४६७)
४) मुंबई एज्युकेशन ट्रस्ट एशियन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेन्टर, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे (प.), मुंबई-५० (फोन- २६४५३८९९, २६५११२२९)
५) सिद्धार्थ कॉलेज ऑफ कम्युनिकेशन्स, आनंद भवन, डी. एन. रोड, मुंबई-४००००१
६) सोफिया कॉलेज, भुलाभाई देसाई रोड, चर्नीरोड, मुंबई-४०००२६ (फोन नं. २३६३०१५७, २३६१११८३)
७) सेंट पॉल इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पंतनगर, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७५ (फोन नं. २५११९०९५, २५१५४४०३)
८) सेंट झेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, महापालिका मार्ग, मुंबई-४००००१ (फोन नं. २२६२१३६६, २२६२१६३९, २२६२२८७७)
९) WIGAN & LEIGH COLLEGE, मॉडर्न मिल्स कम्पाऊंड, केशवराव खाडय़े मार्ग, जेकब सर्कल, महालक्ष्मी, मुंबई-४०००११ (फोन नं. २३०१५५९१, २३०१५६०२, २३०१५६३९)
बारावीनंतर B.A. in Advertising हा कोर्स खालील संस्थांमध्ये उपलब्ध आहे :
१) मुंबई विद्यापीठ, मुंबई
२) सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस, चर्नीरोड, मुंबई
३) झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, धोबी तलाव, मुंबई
४) एच. आर. कॉलेज, चर्चगेट, मुंबई
५) जयहिन्द कॉलेज, चर्चगेट, मुंबई
६) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक
(२) पत्रकारिता (जर्नालिझम) : प्रिंट मीडिया हा केवळ वृत्तपत्रापुरताच मर्यादित नसून त्याचे क्षेत्र विस्तारलेले आहे. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांचाही यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया फोफावत चाललेला आहे. वेब जर्नालिझमचादेखील विस्तार वाढत चाललेला आहे. रेडिओ तसेच टी.व्ही.वरील न्यूज चॅनेल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘खिंचो ना कमान को, न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल है तो अखबार निकालो’ असं म्हटलं जातं, यावरूनच वर्तमानपत्रांची ताकद किती जबरदस्त आहे याचा अंदाज येतो; परंतु आज केवळ न्यूज क्षेत्रामध्ये रिपोर्टर, वार्ताहर एवढेच काम नसून एडिटिंग, प्रूफरीडिंग, वृत्तनिवेदक, फोटोग्राफर, क्रीडा पत्रकारिता, राजकीय पत्रकारिता, अर्थविषयक लेखन इ. स्पेशल शाखादेखील उपलब्ध आहेत. संपादक, निवासी संपादक, वृत्त संपादक, सह संपादक, मुख्य उप संपादक, उप-संपादक, वार्ताहर, समीक्षक, छायाचित्रकार अशा विविध पदांवरील संधी पत्रकारितेमध्ये उपलब्ध आहेत.
जर्नालिझममधील पदवी अभ्यासक्रम
१) बॅचलर ऑफ जर्नालिझम : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बारावीनंतर तीन वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
२) बॅचलर इन मास मीडिया (B.M.M.) : मुंबई विद्यापीठाने २०००-२००१ या वर्षांपासून तीन वर्षांचा इ. बारावीनंतरचा हा पदवी अभ्यासक्रम चालू केला आहे. यामध्ये शेवटच्या वर्षांत जाहिरात व पत्रकारिता यात स्पेशलायझेशन करण्याची सुविधा आहे. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात हेच दोन पर्याय नाहीत तर इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेच्या बारावीला किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा नसून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो.
बीएमएम अभ्यासक्रम चालविणारी मुंबईतील कॉलेजेस:
१) के. सी. कॉलेज, चर्चगेट, २) जयहिंद कॉलेज, चर्चगेट, ३) सेंट झेविअर्स, धोबीतलाव, ४) कीर्ती कॉलेज, दादर, ५) रामनारायण रुईया, माटुंगा, ६) एस.आय.ई.एस. कॉलेज, सायन (प.), ७) सोमय्या कॉलेज, विद्याविहार, ८) भवन्स कॉलेज, अंधेरी, ९) नॅशनल कॉलेज, वांद्रे, १०) केळकर कॉलेज, मुलुंड (पू.), ११) ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे (प.).
पदव्युत्तर अभ्यासक्रम- कोणत्याही शाखेची पदवी मिळविल्यानंतर पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करता येतो. खालील संस्थांमध्ये पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
१) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करियर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई.
२) पुणे विद्यापीठ (www.unipune_journalism.org)
३) सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे.
४) सोफिया कॉलेज, चर्नी रोड, मुंबई.
५) सेंट झेवियर्स, धोबीतलाव, मुंबई.
६) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, मुंबई. (फोन नं. २६१७१३६०)
तसेच पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ येथे दोन वर्षांचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
(३) पब्लिक रिलेशन (जनसंपर्क)- मास मीडियाचाच आणखी एक भाग म्हणजे जनसंपर्क यातील काही अभ्यासक्रम पुढील संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
१) इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया फॅशन व अ‍ॅलाईड आर्टस्, कुलाबा. (फोन नं. २८५३०८१/ २८३०१३३)
२) मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई येथे डिग्री कोर्स इन पब्लिक रिलेशन उपलब्ध आहे.
अनेक संधी उपलब्ध असलेलं हे क्षेत्र अतिशय आकर्षक आहे.
(४) बुक पब्लिशिंग (पुस्तक प्रकाशन)- तरुण, होतकरू, कष्टाळू युवकांना प्रसारमाध्यमाचंच एक रूप असलेल्या या क्षेत्रातदेखील अमर्याद आकाश उपलब्ध आहे. यामधील अभ्यासक्रम खालील संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
१) शंकर अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अ‍ॅण्ड बुक पब्लिशिंग, बहादूर शाह जफर मार्ग, न्यू दिल्ली- ११०००२. (फोन- ३३१६९७०/ ७४) येथे पदवीनंतर तीन महिन्यांचा पब्लिशिंगमधील कोर्स चालतो.
२) नॅशनल बुक ट्रस्ट, ग्रीन पार्क विस्तारित, न्यू दिल्ली येथे चार आठवडय़ांचा बुक पब्लिशिंगमधील कोर्स चालतो. पदवीनंतरचा हा कोर्स ऑक्टोबरमध्ये सुरू होतो.
अशा प्रकारे मास मीडिया हे क्षेत्र म्हणजे दिवसेंदिवस अफाट वेगाने विस्तारत चाललेले क्षेत्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येकजण खरंतर या मीडियाच्याच छायेखाली वावरत असतो. या मीडियाचा ठसा सर्वच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नवनवीन वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स, जाहिराती, चित्रपट, संपादन, स्क्रिप्ट रायटिंग, फोटोग्राफी, रेडिओ जॉकी, विश्लेषणात्मक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून प्रचंड संध्या उपलब्ध आहेत.
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सतत जागरूक असावे लागते, अभ्यासू असणे आवश्यक असते, तर्कशुद्ध विचारांची आवश्यकता असते, विद्वान लोकांच्या सहवासात राहायला मिळते. साहजिकच अशा तरुणांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक फुलत जाते, समाजावर त्यांची विशेष छाप पडते, मान-समान प्राप्त होतो. संस्कृतात म्हटल्याप्रमाणे,
य: पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुषाश्रयति।
तस्य दिवाकर किरणर्नलिनीदलमिव विकास्यते बुद्धि ।।
म्हणजेच जो अभ्यास करतो, लिहितो, निरीक्षण करतो, विचारतो, विद्वानांचा आश्रय घेतो, त्याची बुद्धी सूर्यकिरणांनी कमळाच्या पाकळ्या उमलाव्या त्याप्रमाणे विकास पावते.
तेव्हा या क्षेत्रात येऊन तरुणांना स्वार्थ व परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य करता येऊ शकतात, त्या म्हणजे स्वत:ची उन्नती व त्याचबरोबर समाजाची प्रगती, कारण मित्रांनो, सध्याचे युग आहे प्रसार माध्यमांचे!

    No comments:

    Post a Comment