Friday, October 2, 2009

ऊर्जेतील प्रकाशमान करिअर्सPrintE-mail
बुधवार, ३० सप्टेंबर २००९
आनंद मापुस्कर - फोन : ०२२-३२५०८४८७.
मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून मला वीजनिर्मिती क्षेत्रातील संधीबाबत कृपया मार्गदर्शन करावे? - गणेश रायकर

ऊर्जेशिवाय जगाची कल्पना आपण करूच शकत नाही. ऊर्जाच शहरातील तसंच ग्रामीण भागातील जीवन प्रकाशमान करते. वाहनांना गती व कारखान्यातील मशिनरी चालवते. क्षणाक्षणाला आपण ऊर्जेवर अवलंबून आहोत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासूनच्या लोड शेडिंगमुळे तर ऊर्जेच्या समस्येची तीव्रता जनसामान्यांना अधिकच जाणवू लागली आहे.
औद्योगिकीकरणाच्या आधी मनुष्य ऊर्जेच्या बाबतीत सूर्य, बायोमास (लाकूड, झाडांची पानं, काटक्या वगैरे), जल तसंच वारा आदी नवनिर्मिती होऊ शकणाऱ्या (Renewable) स्रोतांवर प्रामुख्याने अवलंबून होता. औद्योगिकीकरणाच्या काळात वाढत्या उद्योगांमुळे मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता भासू लागली. या काळातच कोळशापासून, तेलापासून तसंच नैसर्गिक वायूपासून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला. वीजनिर्मितीचे हे स्रोत पुन्हा नव्याने निर्माण करता येण्याजोगे नाहीत. (Non-renewable Sources) तसंच यामुळे हवेचं प्रदूषणही मोठय़ा प्रमाणावर होतं. जगाची लोकसंख्या १८५० ते १९७० दरम्यान ३.२ पटीने वाढली, तर ऊर्जेची आवश्यकता २० पटींनी वाढली. यामुळे एनर्जी मॅनेजमेंट या विषयामध्ये काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यशक्तीची आवश्यकता आहे. दररोजच्या जीवनात ऊर्जेचा वापर विजेच्या माध्यमातून होतो. वीजनिर्मिती ही विविध प्रकारे केली जाते.
औष्णिक ऊर्जा : कोळसा हे निसर्गात मुबलक प्रमाणात सापडणारं जीवाश्म इंधन आहे. कोळसा जाळून औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामधून वीज तयार केली जाते. भारतातील ७० टक्के वीजही कोळशापासून तयार होते. निर्मिती प्रक्रियेमध्ये हवेतील घातक वायूचं प्रमाणही वाढते. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या कोळशाचा साठा जास्तीत जास्त १०० वर्षे पुरेल. त्यामुळे वीजनिर्मितीच्या अन्य माध्यमांकडे वळणं जरुरीचं आहे.
तेल व नैसर्गिक वायू : तेल व नैसर्गिक वायूपासूनही वीजनिर्मिती केली जाते. यामध्येदेखील हे साठे पुन्हा नव्याने तयार होत नसल्याने प्रदीर्घ काळासाठी वीजनिर्मितीच्या मर्यादा आहेत.
जलविद्युत : भारतातील २० टक्के वीज निर्मितीही जलविद्युत प्रकल्पांमधून तयार केली जाते. जलविद्युत प्रकल्पातून मिळणारी वीजही तुलनेने स्वस्त व निर्मितीमध्ये प्रदूषण न करणारी असते. पण मोठय़ा धरणाद्वारे वीजनिर्मितीमध्ये पर्यावरण व सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागतं. छोटय़ा धरणांची निर्मिती हा वीजनिर्मितीसाठी चागंला पर्याय मानला जातो.
अणुऊर्जा (न्यूक्लिअर एनर्जी) : अणुविघटनामधून तसंच चेन रिअ‍ॅक्शनमुळे आष्णिक ऊर्जा तयार करता येते. परंतु या मार्गाने वीजनिर्मिती करताना किरणोत्सर्गी घटक तयार होतात. यामुळे जीवितसृष्टीला हानी पोहोचू शकते. यामुळे या माध्यमातून अगदी अल्प वीजनिर्मिती केली जाते.
पर्यायी ऊर्जास्रोत : सूर्यप्रकाश, वारा तसंच समुद्राच्या लाटा व जिओथर्मल एनर्जी आदी माध्यमांतून मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतातील सहा टक्के वीजनिर्मिती या माध्यमांतून केली जाते. या माध्यमातून वीजनिर्मिती करताना प्रदूषण होत नाही. तसंच वरील गोष्टींचा साठा अविरत उपलब्ध राहणार आहे. यामुळे या माध्यमांतून जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न चालले आहेत.
सौरऊर्जा : भारतासारख्या देशामध्ये सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. या ठिकाणी सूर्यप्रकाशापासून विविध प्रकारे ऊर्जानिर्मिती करता येऊ शकते. अन्न शिजवण्यासाठी सोलर कूकर, पाणी तापवण्यासाठी सोलर हीटर तसंच सोलर फोटव्होटाईक सेलच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाचे डी. सी. इलेक्ट्रीसीटीमध्ये रूपांतर केलं जातं. ही वीज बॅटरीच्या रूपात साठवता येते व रात्रीच्या वेळी या विजेचा विविध कारणासाठी वापर करता येतो. सोलर वीजनिर्मितीमध्ये अडथळे येत आहेत. यावरही मात करण्याचे संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत.
पवन ऊर्जा : वाऱ्यापासून वीजनिर्मितीचे प्रयत्न अनेक वर्षांपासून चालू आहेत. पवन चक्क्यांचा वापर करून यांत्रिक स्वरूपामध्ये वाऱ्यापासून ऊर्जानिर्मिती केली जाते. याचा उपयोग कारखान्यातील यंत्र चालविण्यासाठी होऊ शकतो किंवा जनरेटर चालवून वीजनिर्मिती केली जाऊ शकते. भारतामध्ये केंद्र सरकारकडून पवनचक्क्यांना मोठय़ा प्रमाणावर अनुदान दिलं जातं.
बायोमास : यापासूनदेखील वीज तसंच अन्य रूपात ऊर्जानिर्मिती (गोबर गॅस) केली जाऊ शकते. यामध्ये मनुष्यनिर्मित ओला कचरा, प्राणिमात्रांची विष्ठा, लाकूडउद्योग व कृषिउत्पादनातील बाय प्रॉडक्ट आदींचा उपयोग केला जातो. याद्वारे वीजनिर्मिती करताना केमिकल प्रक्रिया करून गॅसनिर्मिती केली जाते. पुढे स्वयंपाकासाठी हा गॅस वापरता येतो किंवा यापासून वीजनिर्मितीदेखील करता येते. उसाच्या चिपाडापासूनही वीजनिर्मिती प्रकल्प काही साखर कारखान्यांनी सुरू केले आहेत, तर महानगरांमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्राच्या लाटेपासून वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. वरील सर्व प्रकारे वीजनिर्मितीचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर चालले आहेत. या विषयाला चालना देण्यासाठी न्यू अ‍ॅण्ड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.
खालील संस्थांमध्ये रिन्यूएबल एनर्जी सिस्टीम्स संबंधातील प्रशिक्षण दिलं जातं.
* इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, नवी दिल्ली.
दूरध्वनी : ०११-२४६८२२१४-२१. वेबसाईट : www.iredalted.com
* सेंटर फॉर सोलर एनर्जी रिसर्च टेक्नॉलॉजी डिसिमिनेशन, मुदराई
दूरध्वनी : ०४५२-२५३७९२३४.
* कर पगम पॉलिटेक्निक कॉलेज, पोलाची मेन रोड, इआचेनरी पोस्ट, कोइम्बतूर दूरध्वनी : ०४२२- २६१११४६.
वेबसाइट : www.karpagameducation.com
* सोलर एनर्जी सेंटर, गुरगाव, हरियाणा
वेबसाइट : http:imnes.nic.in/solarenergy.htm
* सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी, व्ही. टी. हाय रोड, पल्लीकरनाई,
चेन्नई-६०१३०२. दूरध्वनी : ०४४-२२४६३९८२. वेबसाईट : www.cwet.tn.nic.in
* सरदार स्वर्णसिंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिन्यूएबल एनर्जी, जालंधर, पंजाब
* स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज, जादवपूर विद्यापीठ, कोलकाता-७०००३२.
वेबसाइट : www.jadavpur.edu दूरध्वनी : ०३३-४७३२८५३.
या विद्यापीठामध्ये तीन सेमिस्टरचा एमटेक (एनर्जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एनर्जी मॅनेजमेंट अँड ऑडिट या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे, तसेच सोलर फोटोव्होलटाईक, सोलर थर्मल, विंड एनर्जी, बायोगॅस, बायोमास, फोटो केमिकल मिनी मायक्रो हायडल व एनर्जी मॅनेजमेंट या विषयातील छोटे प्रशिक्षण अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत.
वरील अभ्यासक्रमाबरोबरीनेच ऊर्जा क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक वाटा उपलब्ध आहेत. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक विषयांतील तज्ज्ञांची गरज भासते. ऊर्जा निर्मितीमध्ये साधारणत: इलेक्ट्रिकल, इंजिनीअर्स वीजनिर्मिती, वितरण व्यवस्थापन, वीजवहनातील तूट कमी करणं यासाठीची इलेक्ट्रिल इन्स्ट्रमेंटेशन इत्यादी करतात. औष्णिक (Thermal) ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर्सची आवश्यकता असते. जलविद्युत प्रकल्पांमध्ये धरण बांधणं, पर्जन्यक्षेत्र ठरवणं यासाठी सिव्हिल इंजिनीअर्स लागतात, तर टर्बाईन वगैरेसाठी मेकॅनिकल इंजिनीअर्सची आवश्यकता असते. प्रत्यक्ष वीजनिर्मिती झाल्यावर इलेक्ट्रिल इंजिनीअर्सची आवश्यकता असते. बायोमासेसपासून वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये केमिकल इंजिनीअर्स तसंच अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीअर्सची गरज असते. विजेच्या धोरणाची आखणी करताना डेव्हलपमेंट इकोनॉमिस्टची आवश्यकता असते. बायोगॅस तसेच वीज वापरविषयक जनजागृतीसाठी मोठय़ा प्रमाणावर सोशल वर्करचीदेखील गरज आज आहे. या क्षेत्राच्या वाढीचा दर ३० टक्के इतका आहे.
वीजनिर्मितीच्या क्षेत्रात जाण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई. (इलेक्ट्रिकल), बी.ई. (मेकॅनिकल), बी.ई. (सिव्हिल), बी.ई. (केमिकल) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. महाराष्ट्रातील वरील अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसाठी www.dte.org.in ही वेबसाइट पाहावी.
पदव्युत्तर शिक्षणामध्ये एनर्जी मॅनेजमेंटविषयक अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
* महाराष्ट्रामध्ये एम.ई. (मास्टर इन इंजिनीअरिंग)ला कंट्रोल सिस्टीम व पॉवर सिस्टीम्स असेदोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
महाविद्यालयांच्या माहितीसाठी www.dte.org.in ही वेबसाइट पाहावी.
* आय.आय.टी.मधून एम.टेक. (पॉवर सिस्टीम्स) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम आय.आय.टी. मुंबई, दिल्ली, खरगपूर या ठिकाणी आहे. गेट परीक्षेद्वारे अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. तसेच बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) च्या विद्यार्थ्यांना एम.एस्सी., पीएच.डी. या दुहेरी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यासाठी जॅम ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अधिक माहितीसाठी www.iitb.ac.in ही वेबसाइट पाहावी.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वेल्फेअर अ‍ॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट,
मॅनेजमेंट हाऊस, कॉलेज स्क्वेअर वेस्ट, कोलकाता-७०००७३.
दूरध्वनी : ०३३-२२४१३६४८. वेबसाइट : www.iiswbm.org
या संस्थेमधून एनर्जी मॅनेजमेंटमधील दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स चालवला जातो.
* डॉ. आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ प्रॉडक्टिव्हिटी
ही संस्था नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिलची प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या वतीने ब्यूरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बी.ई.ई.- भारत सरकारची वैधानिक संस्था) ची एनर्जी मॅनेजर्स व एनर्जी ऑडिटर्सची प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. एनर्जी मॅनेजर्स व एनर्जी ऑडिटर्सच्या परीक्षेच्या माहितीसाठी www.em.ea.org ही वेबसाइट पाहावी.
याच संस्थेमध्ये एनर्जी मॅनेजमेंटवरील दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम चालवला जातो. इंजिनीअरिंगमधील पदवीधारक याला प्रवेश घेऊ करतात. अधिक माहितीसाठी www.npcindia.org ही वेबसाईट पाहावी.
* देवी अहिल्या विद्यापीठ, आर. एन. टी. मार्ग, इंदूर (मध्य प्रदेश) ४५२००१. दूरध्वनी : ०७३१-२५२७५३२. वेबसाइट : www.davniv.ac.in
या विद्यापीठामध्ये एम.टेक. (एनर्जी मॅनेजमेंट) हा नियमित व दूरशिक्षणाद्वारे अभ्यासक्रम चालवला जातो.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
देशभरामध्ये १७ ठिकाणी नॅशनल इनिस्टटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आहेत. पूर्वी यांना रिजनल इंजिनीअरिंग कॉलेज म्हटले जायचे. या संस्थांमधून एम.टेक. अभ्यासक्रमासाठी एनर्जी मॅनेजमेंट संदर्भातील पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
वरील विविध अभ्यासक्रमांमधून आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार अभ्यासक्रम पूर्ण करून ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात आपणदेखील चांगलं करिअर करू शकता. एनटीपीसी, गेल, ओएनजीसीसारख्या सरकारी उपक्रमाांमध्ये तसेच टाटा, रिलायन्स, आदी खासगी वीजनिर्मिती कंपन्यांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. मोठमोठय़ा उद्योगांमध्येही एनर्जी ऑडिटर व मॅनेजर्सची आवश्यकता असते. या क्षेत्रात करिअर करून आपण स्वत:सोबत अनेकांच्या जीवनात प्रकाश आणू शकता.

    No comments:

    Post a Comment