Friday, October 23, 2009

‘टीस’चा दर्जा मात्र उंच भला!
गुरुवार, २२ ऑक्टोबर २००९
प्रा. प्रवीण घोडेस्वार - gpraveen18feb@gmail.com
भारतात उच्च शिक्षणाच्या ज्या काही मोजक्या दर्जेदार इन्स्टिटय़ूटस् आहेत त्यात ‘टीआयएसएस’ किंवा ‘टीस’ अग्रस्थानी आहे. येथील प्रवेश परीक्षाच अर्जदार विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस पाहणारी असते. देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे भिन्न- भिन्न भाषक व सांस्कृतिक वातावरणाची ओळख, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमधल्या क्षमतांना पुरेपूर संधी आणि अनुभव समृद्ध करणारा फिल्ड एक्स्पिरिअन्स ही गुणवैशिष्टय़ेच ‘टीस’ला उच्च दर्जा देणारी आहेत.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था अर्थात टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस- ‘टीआयएसएस’ किंवा ‘टीस’ हे विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारत सरकारचे अनुदानप्राप्त आशिया खंडात नावाजलेले स्वायत्त विद्यापीठ (demeed university) आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे सन १९३६ मध्ये स्थापन झालेली ही इन्स्टिटय़ूट देशातच नव्हे तर परदेशातही आपला लौकिक राखून आहे. समाजकार्याचं व्यावसायिक शिक्षण (professional education) देणारी ही आशिया खंडातली पहिली संस्था. ‘सर दोराबजी स्कूल ऑफ सोशल वर्क’ या नावानं अस्तित्वात आलेल्या या संस्थेने देशाच्या शैक्षणिक विकासात दिलेलं योगदान हा खरं तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षांसाठी ‘टीआयएसएस’ची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झालेली आहे. या इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यान्वित असलेल्या विविध पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.
‘टीआयएसएस’मध्ये सध्या सहा विद्याशाखा (schools) आणि चार स्वतंत्र केंद्रांमार्फत एकूण १६ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम राबविले जातात. हे सर्व अत्यंत उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षणक्रम असून सध्याच्या सामाजिक परिस्थितीशी आणि जागतिक परिप्रेक्ष्याला सुसंगत अशी त्यांची रचना केलेली आहे. या सर्व शिक्षणक्रमांचा कालावधी दोन वर्षे असून त्यांची नावं खालीलप्रमाणे-
१) सोशल वर्क
२) डिसॅबिलीटी स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन
३) डेव्हलपमेंट स्टडीज
४) एज्युकेशन (एलेमेंट्री)
५) काऊन्सेलिंग
६) वीमेन्स स्टडीज
७) ह्य़ुमन रीसोर्सेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड लेबर रिलेशन्स
८) सोशल एंटरप्रेअरनरशिप
९) ग्लोबलायझेशन अ‍ॅण्ड लेबर
१०) पब्लिक हेल्थ- हेल्थ पॉलिसी- इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड फिनान्स
११) पब्लिक हेल्थ- सोशल एपीडीमोलॉजी
१२) हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
१३) हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
१४) हॅबीटॅट पॉलिसी अ‍ॅण्ड प्रॅक्टीस
१५) डिझास्टर मॅनेजमेंट
१६) मीडिया अ‍ॅण्ड कल्चरल स्टडीज
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी प्राप्त उमेदवार या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्या विद्यार्थ्यांना १२ जून २०१० पर्यंत त्यांच्या पदवी परीक्षेचे निकाल प्राप्त होणार असतील असे पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकणारे विद्यार्थीही प्रवेश अर्ज सादर करू शकतात. मात्र ‘एम.ए. इन एज्युकेशन- एलेमेन्ट्री’साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ मे २०१० पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वैद्यकीय विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचा intership कालावधी १२ जून २०१० पर्यंत पूर्ण झालेला असावा.
या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर येथे ही परीक्षा घेतली जाईल. अपवादात्मक परिस्थितीत एखादे परीक्षा केद्र कार्यान्वित न झाल्यास अर्जदारास जवळच्या केंद्रावर परीक्षा देता येईल. एक अर्जदार वरीलपैकी जास्तीत- जास्त तीन शिक्षणक्रमांसाठी प्रवेशअर्ज सादर करू शकतो. माहितीपुस्तिकेसह प्रवेश अर्जाचे शुल्क प्रती शिक्षणक्रमासाठी रु. ७५०/- असून त्यासाठी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ या नावाने मुंबई येथे देय असलेला डी. डी. काढवा लागेल. शिक्षणक्रमाची माहिती आणि प्रवेश अर्ज इन्स्टिटय़ूटच्या www.tiss.edu या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे. तसेच प्रवेश अर्ज शुल्काचा डी.डी. सह विनंतीपत्र पाठविल्यास पोस्टानेही उपलब्ध करून घेता येईल.
शिवाय इन्स्टिटय़ूटच्या कॅश काऊन्टरवरूनही प्रत्यक्ष जाऊन प्रवेशअर्ज प्राप्त करता येईल. ज्या बेरोजगार एससी/ एसटी अर्जदारांच्या पालकांचे उत्पन्न २००८-०९ या आर्थिक वर्षांत एक लाखापेक्षा कमी आहे अशांना जातीच्या व उत्पन्नाच्या दाखल्याची प्रमाणित प्रत सादर केल्यास माहितीपुस्तकेसह प्रवेशअर्ज विनाशुल्क प्राप्त होईल. अर्ज पोहोचण्याची प्रक्रिया सुरळीत नि सुलभ होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे हिताचे आहे. प्रवेश अर्ज ऑनलाइन सादर केल्यावर त्यांची प्रिंट काढून त्यासोबत डी.डी. जोडावा आणि ‘टीआयएसएस’कडे पाठवावी.
सर्व शिक्षणक्रमांसाठी भारत सरकारच्या नियमानुसार एससी/ एसटी/ ओबीसी/ अपंग या संवर्गांसाठी आरक्षण दिले जाते. संस्थेत मोजक्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय आहे. पण ज्यांना या सुविधेचा लाभ होणार नाही. त्यांनी आपल्या निवासाची व्यवस्था स्वत: करावी. प्रवेश अर्ज सादर केलेल्या सर्व एससी/एसटी/ओबीसी अर्जदारांसाठी १३ ते १५ नोव्हेंबर २००९ दरम्यान मुंबई, दिल्ली, कोलकाता व गोहाती येथे प्रवेश परीक्षेसाठीचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षणसत्र आयोजित केलं आहे.
संपूर्ण भरलेले प्रवेशअर्ज २३ ऑक्टोबर ०९ पर्यंत टीआयएसएसच्या मुंबई येथील पत्त्यावर पोहोचायला हवेत. प्रवेश परीक्षा रविवार, १३ डिसेंबर २००९ रोजी वर उल्लेख केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल. अधिक तपशिलासाठी www.tiss.edu या संकेत स्थळावर किंवा ०२२- २५५२५२६२ ते ६५ या क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
मानवविद्या, सामाजिकशास्त्रे, सार्वजनिक आरोग्य, मनुष्यबळ विकास यासारख्या क्षेत्रांत उज्ज्वल करीअर करण्यासाठी ‘टीआयएसएस’मधल्या शिक्षणाला तोड नाही. अत्यंत व्यासंगी, कुशाग्र अध्यापकवृंद, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थी- अध्यापकांचं समानतेचं नातं, विद्यार्थ्यांमधल्या क्षमतांना पुरेपूर संधी देणारं वातावरण, समृद्ध करणारा फिल्ड एक्सपीअरिन्स, इन्स्टिटय़ूटमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नेतृत्वक्षमतेला वाव देणारे विविध उपक्रम, देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे भिन्न- भिन्न भाषक व सांस्कृतिक वातावरणाची ओळख होण्याची संधी यासारख्या गुणवैशिष्टय़ांमुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होतो. हे मी स्वत: या इन्स्टिटय़ूटचा माजी विद्यार्थी असल्याने खात्रीने सांगू शकतो. येथील प्रवेश परीक्षा अर्जदाराच्या बुद्धीचा कस पाहणारी असते. भारतात उच्च शिक्षणाच्या ज्या काही मोजक्या दर्जेदार इन्स्टिटय़ूटस् आहेत त्यात ‘टीआयएसएस’ अग्रस्थानी आहे. आयआयटी, आयआयएमप्रमाणेच ‘टीस’ चा दर्जाही तेवढाच उंच आहे. येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व अर्जदारांना शुभेच्छा!

No comments:

Post a Comment