पाणी-नियोजनातील करिअर संधी : चला वर्षांजलसंधारण करू, पाणीटंचाई दूर करू..
गुरूवार, २२ ऑक्टोबर २००९
सुधीर मुकणे - ९८२१३८६६१४
‘पाणी’ ही सुंदर धरतीवरची सर्वात मौल्यवान व अनमोल ‘चीज’ आहे व त्यामुळेच इथे सजीव-सृष्टी जिवंत आहे. पाण्याशिवाय जगणे कुणालाही कदापि शक्य होणार नाही. म्हणून जीवन जगण्यास लागणाऱ्या या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वराने पृथ्वीसाठी दिलेली ती सर्वोत्तम देणगी आहे व जीवनदान देणारे हे ‘पाणी’ या पृथ्वीतलावरचे एक निर्विवाद सत्य ठरले आहे.
पावसाळ्याचे चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी संपूर्ण वर्षभर वापरून पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुरवायचे असते. पाणीपुरवठय़ाचे गणित हे लोकसंख्येवर आधारित असते. कमी लोकसंख्येसाठी कमी पाणी व जास्त लोकसंख्येसाठी जास्त पाणी लागत असते; पण या पुरवठा करण्याच्या हिशेबावर वाढत जाणारी लोकसंख्या, शहरीकरण, तापमानातील वाढ, हवामान बदल इ.चा थेट परिणाम होत असल्याने दरवर्षी पडणारा मान्सून कमी-कमी होत चालला आहे व त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र पाणीटंचाई झाली आहे व आजच्या अजस्त्र लोकसंख्येला पाणी साहजिकच कमी पडत आहे. त्यासाठी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त झाले आहे व त्याशिवाय पाण्याची पूर्तता होणे अशक्य होऊ शकते.
‘पाणी’ हे निसर्गाचे वरदान आहे. त्याला तोड नाही. आजचे ‘सायन्स’ कितीही पुढे गेले असले तरी काही गोष्टींची निर्मिती करणे आजही मनुष्याच्या आवाक्यात नाहीत त्यापैकी एक म्हणजे ‘पाण्याची निर्मिती’ लाखो रुपये खर्च करून कृत्रिम पाऊस पाडणे किंवा समुद्राचे पाणी गोडे करून पाणीपुरवठा करायला ‘भारत’ हा खूप श्रीमंत देश तर नाहीच; पण ती परवडण्यासारखीसुद्धा बाब नाही म्हणून या सर्व फंदात न पडता दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थितरीत्या जरी करण्यात आले तरी आपण खूप काही साध्य करून पाणीटंचाईसारखी भीषण समस्या सोडवू शकतो. त्यासाठी पर्याय म्हणून आपल्याकडे ‘जलवर्षोसंधारण’ (Rain-Water Harvesting) करून जमिनीची जलधारण क्षमता वाढविता येते व ‘पाणी जिरवा, पाणी मुरवा- पाणी उपसा’ या कार्यप्रणालीचा अवलंब करून आपले जीवन पाणीटंचाईमुक्त सहजरीत्या करणे शक्य झाले आहे.
इमारतीची गच्ची, कौलं, पत्रा यावरून पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून तेथील बोअरवेलजवळ नेऊन सोडणे व त्या जमिनीत ते मुरविणे या पद्धतीला ‘जलवर्षोसंधारण किंवा रेन वॉटर हारवेस्टिंग’ म्हणतात.
भविष्याची भावी गरज व काळाची निकड असल्याने या पाणी नियोजनातील क्षेत्रात आपण काम करून त्यातून पैसा व कामाचे खरे समाधान चांगल्या प्रकारे मिळविता येऊ शकते. या पाणीनियोजनाच्या क्षेत्रांत काम करायचे- असल्यास लागणाऱ्या आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे-
१) सर्वात प्रथम म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाण्याबद्दल अतिशय प्रेम व उत्कंठा असणे खूपच गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय, अतिवापर होताना ते बघून ज्यांचा जीव तळमळतो, ज्यांच्या जीवाला लागते व हिंदीमध्ये सांगायचे तर ‘वो देख के जिसका दिल जलता है।’ अशा व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीच या क्षेत्रात काम करू शकतात. कारण पाण्याचे महत्त्व त्यांनी सर्वात प्रथम जाणणे आवश्यक ठरते. २) पर्यावरणाची आवड व निसर्गाकडे मनाची ओढ असल्यास या रेनवॉटर हारवेस्टिंग क्षेत्रात जास्त चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकते. ३) ज्यांना पाण्याचे महत्त्व नीट समजले, पटले त्याच व्यक्तींकडून खरी पाण्याची किंमत दुसऱ्यांना पटवून खरी बचत करून घेता येऊ शकते. ४) या क्षेत्रात काम करून पाण्याविषयक जनजागृती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सोशल वर्करची आज खरंच गरज आहे तरच पाणीटंचाई दूर करणे शक्य होऊ शकते. ५) पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती असून, भावी गरज संपन्न होऊ शकते.
पात्रता : पाणी नियोजनाच्या या रेनवॉटर हारवेस्टिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी कमीतकमी बारावीपर्यंत शिक्षण किंवा बांधकामाचा इतर कोणताही कोर्स, तसेच सिव्हिल डिप्लोमा व डिग्री केलेल्या व्यक्ती काम करू शकतात व त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात या रेनवॉटर हारवेस्टिंगचा समावेश होत असल्याने या क्षेत्रात अनुभव असणाऱ्या व्यक्तीसुद्धा आपले नशीब आजमवू शकतात. खास अनुभव व प्रशिक्षणाची गरज नसते.
सध्या भारतामध्ये ‘सेंटर फॉर एन्व्हारमेण्ट सायन्स’(Centre for Environmental Science) नवी दिल्ली येथे एक आठवडय़ाचा कोर्स आहे, तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे रेनवॉटर हारवेस्टिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था, तसेच इतर खासगी कंपन्यांकडून ‘वर्क-शॉप’ व सेमिनारचे- आयोजन केले जाते. त्याबद्दलची जाहिरात व माहिती दैनिंक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली जाते. त्यासाठी आपल्या नियमित वाचनाच्या सवयीची आवश्यकता असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल.
आज पाणी नियोजनाच्या म्हणजेच ‘रेनवॉटर हारवेस्टिंग’ किंवा जलवर्षोसंधारणाच्या क्षेत्रात १०० पैकी १० टक्के लोक कार्यरत आहेत; पण या क्षेत्राला अधिक मानवी बळाची गरज आहे. जास्तीत जास्त तरुणवर्गानी या क्षेत्रात आपले करिअर करण्याची आवश्यकता आहे. मान्सूनची सततची हेलकावणी व मनमानी पाहता पुढील काळासाठी प्रत्येक घरासाठी प्रत्येक इमारतीसाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. आजही ९० टक्के लोकांची या क्षेत्राला गरज आहे कारण प्रत्येकासाठी पाण्याचे नियोजन झाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणे कठीण आहे मग त्यासाठी प्रशासनाला मदत न करणाऱ्यांविरुद्ध दंड, सक्ती व कायदे केल्याशिवाय पर्यायच नाही. मग पुढे काहीही होवो; पण पाण्याचे नियोजन व्हायलाच हवे, प्रत्येकाने करायलाच पाहिजे तेव्हाच आपण खरा ‘भारत’ १०० टक्के पाणीटंचाई मुक्त करू शकू व दुसऱ्यांसाठी जगात एक आदर्श निर्माण करू शकू! तरच पाण्याबद्दलची आत्मीयता खऱ्या अर्थाने जपली जाऊ शकेल!
No comments:
Post a Comment