| वास्तुविशारद सौंदर्यासक्त नजरेचे करिअर | ![]() | ![]() |
बुधवार, ३० सप्टेंबर २००९पुष्कर मुंडले, संपर्क- ९९६९४६३६१० मुंबईतल्या जुन्या-नव्या देखण्या इमारती, राजवाडय़ांचे शहर अशी उपाधी लाभलेल्या कोलकात्यातील भव्य राजवाड, जयपूरच्या कलाकुसरीने सजलेल्या इमारती, चंडीगढ हे शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहिलेले एक देखणे शहर, आग्य्राचा ताजमहाल, दिल्लीचा लाल किल्ला, गोव्यातील मन मोहून टाकणारी बारीक कलाकुसरीची परंतु ऐसपैस दालने, साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेले संस्थानिकांचे वैविध्यपूर्ण राजवाडे ते अगदी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे सारे पाहता आपण भान हरवून जातो.. अगदी आर्किटेक्टला म्हणजे वास्तुविशारदास. गायकाच्या सुरेल आवाजाचा गळा, संगीतकाराची पियममोनाममेवरील फिरणारी बोटे, चित्रकाराचा झपकन वरून खाली येणारा जिवंत कुंचला, अवघे सौंदर्यासक्त जग आपल्या इवल्याशा कॅमेऱ्यात पकडताना क्लिक होणारी छायाचित्रकाराची बोटे आणि वास्तुविशारदाची सौंदर्यासक्त नजर या साऱ्या गोष्टी निसर्गदत्त आहेत हे खरे असूनही सूक्ष्म निरीक्षण शक्ती, प्रसन्न आणि उमदे व्यक्तिमत्त्व, उत्तम विश्लेषणात्मक गणिती नजर असेल, सुंदरातील सुंदर टिपण्याचे रेखाटण्याचे, आत्मभान, सौंदर्यासक्त दृष्टी या गोष्टी आत्मसात करता येत असतील तरीही उत्तम वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होता येते. वाढती मागणी : भारताची सध्याची लोकसंख्या १०० कोटी आहे. तिचा क्षेत्रफळ विस्तार प्रचंड आहे. विविधतेत एकता ही तिची संस्कृती आहे. वास्तुविशारदांचा विचार करताना हा रुंद पाया अतिशय महत्त्वाचा आहे. या पाश्र्वभूमीवर वास्तुविशारदांच्या संख्येचा विचार करता गेल्या ५० वर्षांत त्यात ३०० पटीने वाढ झाली असली तरी तुलनेने ही संख्या खूपच कमी आहे. अगदी अलीकडच्या आकडेवारीनुसार सध्या देशात सुमारे २५००० वास्तुविशारद कार्यरत आहेत. तसेच प्रत्यक्ष आकडेवारी पाहता आजही ६०००० लोकसंख्येत एक आर्किटेक्ट असे अतिशय निम्नस्तरीय प्रमाण समोर आहे. म्हणूनच आजही वास्तुविशारदांना प्रचंड मागणी आहे. भारतातील वाढते शहरीकरण आणि खेडय़ांचे वेगाने होणारे नियोजन या संदर्भातील शासकीय अहवाल पाहता येत्या २५ वर्षांत भारतात दररोज २०००० घरांची गरज आहे असे दिसते. याचा अर्थ प्रत्येक महिन्यात देशाला लखनऊ शहरातील घरांची गरज आहे. यावरून वास्तुविशारदांना किती मागणी आहे हे लक्षात येते. कामाची व्याप्ती मोठी : १) वास्तुविशारद ते वास्तुविशारदांचा समूह अशा पद्धतीने अलीकडे वास्तुविशारदांच्या कामाची व्याप्ती विस्तारित होत गेली आहे. कारण भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आज सुमारे ३०% लोकसंख्या शहरात राहते. शहराकडे स्थलांतरित होण्याचे आजचे प्रमाण पाहता भविष्यात शहरांतील लोकसंख्येचे प्रमाण ५०% वर जाईल हे नक्की झाले आहे. पर्यायाने शहरांचे सुबद्ध नियोजन हा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यामुळेच वास्तुविशारदांच्या कामाची व्याख्या आता केवळ एका घरापुरती किंवा व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहिलेली नसून ती गृहप्रकल्प, अनेक गृहप्रकल्प- ते नियोजनबद्ध एक छोटे शहर अशा पद्धतीने सामूहिक पातळीवर त्या व्याख्येचा विस्तार होत गेला आहे. त्यामुळे बहुविध वास्तुविशारद आणि अनेक वास्तुविशारदांनी एकत्र येऊन स्वीकारलेले आव्हान अशी व्याख्या आता अस्तित्वात आली आहे. २) हे झाले गृहप्रकल्पांच्या शहरांच्या नियोजनाबाबत, शहर नियोजनाबरोबरच आता खेडय़ांचे सुबद्ध नियोजन अपरिहार्य झाले आहे. शासनाचे तसे धोरण जाहीर झाले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अर्थातच वास्तुविशारद ते वास्तुविशारदांचा समूह याचा विस्तार खेडय़ांच्या सुबद्ध नियोजनाशी लागू होतो. त्यामुळे ‘टाउन प्लॅनर’ यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यायाने त्यांच्या हाताखाली अनेक छोटय़ामोठय़ा आर्किटेक्टची यंत्रणा उभी राहत आहे. ३) जागतिकीकरणाच्या संदर्भाने वास्तुशास्त्र संकल्पनेत एक नवा विचार समोर आला आहे. किरकोळ व्यापारी गाळ्यांपासून ते प्रचंड मोठय़ा व्यापारी संकुलापर्यंत हे वास्तुशास्त्र पुढे सरकले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे १०x१० आकाराच्या उद्योगाच्या संकल्पनेचे महत्त्व कमी होत जाऊन प्रचंड मोठय़ा उद्योगांचे प्रकल्प वास्तुविशारदांना आव्हान देत आहेत. ४) जागतिकीकरणामुळे केवळ उद्योग व्यवसायाचेच स्वरूप विस्तारलेले आहे असे नव्हे तर त्या अनुषंगाने पर्यटन आणि पर्यायाने हॉटेल उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे तेथे ज्यांच्याकडे सौंदर्यासक्त दृष्टी आणि सृजनशीलता आहे असे वास्तुविशारद संख्येने खूपच कमी पडत आहेत. बदलत्या प्रवाहात फॅमिली डॉक्टरची संकल्पना लयाला जाऊन आता बहुविध पद्धतीची इस्पितळे अगदी छोटय़ा शहरात एवढेच नव्हे तर तालुका पातळीवर तसेच जेथे मोठे बाजार भरतात अशा खेडय़ात उभी राहत आहेत. तेथेही वास्तुविशारदांची मोठी गरज भासते आहे. कोणते गुण हवेत ? : मात्र मागणी आहे म्हणून वास्तुविशारद होते हे कुण्या शोम्यागोम्याचे काम आहे असे कोणी समजू नये. ते एक उत्तम स्पेशलायझेशन आहे. वास्तुविशारद होण्यातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे उमेदवारांकडे हवी असणारी सर्जनशील वृत्ती आणि सौंदर्य दृष्टी हा होय. एका बाजूने स्थापत्य अभियंता हा नेहमी सिमेंट आणि विटा यांच्या निर्जीव इमारती सजीव करीत असतो. तो आपल्या सर्जनशीलतेने आणि सौंदर्यासक्त दृष्टीने! विविधतेत एकता याचा तो प्रणेता असतो. त्यामुळे ज्या उमेदाराकडे चित्रकला ज्ञान आरेखन कौशल्य, भौमितिक- त्रमितिक ज्ञान, मॉडेल तयार करण्याची हातोटी, बांधकाम क्षेत्रातील तंत्र आणि साहित्य यातील अद्ययावत ज्ञान घेण्याची जिगुप्सा आहे असे उमेदवार वास्तुविशारद होण्यास पात्र ठरतात. मात्र उमेदवाराकडे केवळ सृजनशीलता आणि सौंदर्यदृष्टी एवढेच असून चालत नाही तर त्याला अपार कष्टाची सवय असणे आवश्यक आहे. बदलत्या संकल्पनेनुसार शहरापासून दूरवर दुसरे शहर उभे करण्यासाठी किंवा नियोजनबद्ध खेडे, औद्योगिक वसाहती, इस्पितळे, हॉटेल्स उभी करण्यासाठी रोजच्या रोज प्रदीर्घ प्रवास, उंच मजले, टाऊनशीप प्रकल्पांमुळे अवाढव्य क्षेत्रस्तिार, दगड माती, चिखल, पाऊस पाणी, तापलेले उन यांचा सहवास ही वास्तुविशारदांची वैशिष्टय़े आहेत. मुख्य म्हणजे वास्तुविशारदांचा अधिकतम सुसंवाद अकुशल कामगारांशी येतो. अशा ठिकाणी संयमाची मोठी गरज भासते. आर्किटेक्टला ‘टेबल आणि साइट’ या परस्परविरोधी आघाडय़ांवर एकाचवेळी आणि तेही नित्यनियमाने लढावे लागते. एकूणच प्रत्येक वेळी बदलत्या वातावरणात काम करण्याची क्षमता असलेले बहुविध व्यक्तिमत्व म्हणजे आर्किटेक्ट अशी व्याख्या करता येते. कारण सरकारी अधिकारी आणि कर्मचारी विविध शाखांचे इंजिनीअर्स ते अगदी अकुशल कामगारांपर्यंत त्याला वावर ठेवावा लागतो. त्यामुळेच मानसिकदृष्टय़ा जो सक्षम आहे अशा उमेदवारांना वास्तुविशारद होणे सोईचे आहे. वास्तुशास्त्रात संगणकाचे ज्ञान आता अपरिहार्य झाले आहे. संगणकाच्या आधारे वास्तुविशारद कमीत कमी वेळेत कितीतरी गोष्टी साध्य करू शकतो. उत्तम आरेखन, इमारतीचा उत्तम आराखडा आणि तपशील इ. बाबी संगणकावर उत्तम प्रकारे आणता येतात. याबाबी कागदांवर उतरवून सृजनशीलतेने तो काम करू शकतो. त्यामुळेच (VIRTUAL REALITY) चे नवे दालन आता वास्तुविशारदांना खुणावते आहे. त्यामुळे सेट्स ऐतिहासिक इमारतींचे बारकावे संगणकावर आणता येत आहेत. त्यामुळे (VISUAL SCRIPTS) मोठय़ा प्रमाणात विकसित होत आहेत. संगणकातील अॅटोकॅड, मिनी स्टुडिओ, पेन अॅण्ड ब्रश इ. प्रणाली महत्त्वाच्या ठरत आहेत. ३-डी स्टुडिओसारखी सॉफ्टवेअर्स बरीच कामे पार पाडीत आहेत. संगणक प्रणालीने (ANIMATION and PRODUCT DESIGN) ची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या आधारे वास्तुविशारद मोठा पल्ला गाठीत आहे ही बाब वास्तुविशारद होणाऱ्यांनी पूर्व तयारी म्हणून लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सुक्ष्म निरीक्षणशक्ती, चातुर्य, तार्किकता आणि व्यावहारिक दृष्टिकोन ही वास्तुविशारदाची आणखी काही वैशिष्टय़े आहेत. असे उमेदवार या क्षेत्रात अधिक यशस्वी ठरतात. याशिवाय ज्यांच्याकडे स्वयंप्रेरणा, विश्लेषक वृत्ती आणि सांख्यिकी क्षमता आहे असे उमेदवार वास्तुविशारद होण्यास लायक ठरतात. शैक्षणिक संधी : वास्तुशास्त्रातील बी. आर्क म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी सर्वात महत्त्वाची मानली जाते. हा अभ्यास पाच वर्षांचा असून त्यासाठी प्रवेश घेताना उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांसह १२ वी उत्तीर्ण असावा लागतो. प्रत्येक ठिकाणी प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने बहुतेक ठिकाणी उमेदवारांना संयुक्त किंवा स्वतंत्ररीत्या प्रवेश परीक्षा द्यावी लागते. याशिवाय उमेदवार डिप्लोमा इन आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर शा पदव्या प्राप्त करू शकतो. तसेच निम्नस्तरीय पातळीवर १० वी नंतर तीन वर्षांचा आर्किटेक्चरल आणि सिव्हिल ड्राफ्टसमनशीप तसेच आर्किटेक्चरल असिस्टंट हे अभ्यासक्रम उमेदवारांना पूर्ण करता येतात. वास्तुविशारदांची वाढती मागणी लक्षात घेता पूर्णवेळ अभ्यासक्रमाबरोबरच अर्धवेळ अभ्यासक्रम उमेदवारांना पूर्ण करता येतो. प्रवेश परीक्षा : बहुतेक ठिकाणी उमेदवारांना यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही प्रवेश परीक्षा सामान्यज्ञान तसेच स्कॉलेस्पिक क्षमता आणि कल चाचणी अशा दोन विभागात घेतली जाते. एकूण प्रश्नांपैकी पहिल्या विभागात फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयांसह ६० टक्के प्रश्न असतात तर चित्रकला, रेखाटन क्षमता, सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी या विभागावरील कल चाचणीसाठी ४० टक्के प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रात ही परीक्षा डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्याद्वारे घेतली जाते. यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद ही परीक्षा केंद्रे असतात. याशिवाय महाराष्ट्राबाहेर बरीच महाविद्यालये असून त्यांच्याही प्रवेश परीक्षा उमेदवारांना देता येतात. अखिल भारतीय स्तरावर व इतर राज्यांतील उमेदवारांसाठी बऱ्याच जागा राखीव असतात. त्याचा फायदा उमेदवारांना घेता येतो. यातील दुसऱ्या विभागातील परीक्षेसाठी उमेदवारांना अधिक तयारी करावी लागते. कारण सौंदर्यदृष्टी, सृजनशीलता, रेखाटन यांच्या ज्या कल पाहणाऱ्या चाचण्या घेतल्या जातात त्या शाळा- महाविद्यालयांत कधीही घेतल्या गेलेल्या नसतात. अशा वेळी जे उमेदवार ड्रॉईंगची इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असतात त्यांना मात्र ही चाचणी तुलनेने सोपी जाते. मात्र ज्यांनी ही ड्रॉईंगची परीक्षा दिलेली नाही परंतु आर्किटेक्चर व्हायची इच्छा आहे त्यांनी मात्र यावर पर्याय म्हणून १२ वीची परीक्षा दिल्यानंतर अशा कला चाचण्यांचा रेखाटनांचा सराव केल्यास ते अधिक फायद्याचे ठरते. यासाठी खासगी पातळ्यांवर अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले जाते. तेथे स्मरणचित्रे, रेषांची आणि आकाराची जाण, चित्रकला नैपुण्य, व्यावहारिक गणित, नगररचनाशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र यांची माहिती घ्यावी अथवा त्या पद्धतीने तयारी करावी. बी. आर्चची संधी : वास्तुविशारदाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम पाच वर्षांचा असून अर्धवेळ अभ्यासक्रम सात वर्षांचा असतो. पूर्ण वेळ अभ्यासक्रमाची विभागणी पदवी आणि डिप्लोमा अशी केली जाते. यासाठी एकूण १० सेमिस्टर असून १६ आठवडय़ांनंतर एक सेमिस्टर अशी पद्धत असते. यात उमेदवारांना सहा महिन्यांचे मान्यताप्राप्त वास्तुविशारदाकडे प्रात्यक्षिक पूर्ण करावे लागते. अभ्यासक्रमात आर्किटेक्चरल कॉन्झरवेशन, बिल्डिंग इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, लँड स्केप आर्किटेक्चर, अर्बन डिझायनिंग इ. विषय शिकवले जातात. त्याशिवाय इंडस्ट्रियल डिझाइन, शहर नियोजन, गृहबांधणी नियोजन असा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. सृजनशीलतेचा धागा पकडून अभ्यासक्रमात डिझाईन मेथडॉलॉजी या विषयाचा समावेश केला गेला आहे. यात सृजनशीलता म्हणजे काय? सृजनशीलता मानसिकता म्हणजे काय? इ. बाबींचा समावेश असतो. एम. आर्च.ची संधी : बहुतेक उमेदवार बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी घेतल्यानंतर थांबतात. भारतात सुमारे १०० वास्तुशास्त्र महाविद्यालये आहेत. मात्र पदवीधरांपैकी केवळ १०% पदवीधरच पुढे एम. आर्च.ला जातात. याचा अभ्यासक्रम दिल्लीच्या सेंटर फॉर प्लॅनिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच दिल्लीच्याच स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर येथे एकवटले आहेत. पुणे येथे एम. आर्च.मधील सिटी प्लॅनिंग अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. याशिवाय चेन्नई येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड प्लॅनिंग आणि खरगपूर येथील क.क.ळ. येथे एम. आर्च.चे काही अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. यापैकी अलीकडे कॉन्झव्र्हेशन ऑफ ओल्ड बिल्डिंग या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय एम. आर्च.मध्ये उमेदवार (१) बिल्डिंग इंजिनीयरिंग मॅनेजमेंट (२) आर्किटेक्चरल कॉन्झव्र्हेशन (३) अर्बन डिझाइन (४) लॅण्डस्केप आर्किटेक्चरल (५) ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग (६) रिजनल प्लॅनिंग (७) अर्बन प्लॅनिंग इ. अभ्यासक्रमांचा समावेश होतो. व्यवसायाची संधी : आर्किटेक्ट यांना खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य लाभते ते व्यवसायांतूनच. बी. आर्च. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यास कमीत कमी दोन वर्षे एखाद्या अनुभवी आर्किटेक्चरकडे काम करावे लागते. त्यानंतर छोटय़ा छोटय़ा फम्र्समध्ये काम करता करता तो अनुभवाची शिदोरी घेऊन मोठमोठय़ा कंपन्यात मोठा अनुभव घेऊ शकतो आणि त्यानंतर स्वत:ची फर्म किंवा भागीदारीतील फर्म काढणे सोयीचे ठरते. उमेदवारांना या व्यवसायात फार मोठी आर्थिक उलाढाल करता येते आणि प्रचंड पैसा मिळवता येतो. साधारणपणे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या नियमानुसार ही मिळकत टक्केवारीच्या रूपात प्राप्त होते. उदा. आर्किटेक्टला एकूण टेंडरच्या एक टक्के रक्कम घेता येते किंवा अर्बन डिझायनिंगच्या एकूण रक्कमेपैकी पाच टक्के रक्कम प्राप्त होऊ शकते. बिल्डिंगच्या अंदाजपत्रकाच्या १०% रक्कम आर्किटेक्ट पदरात पाडू शकतो. मात्र जसजसा अनुभव येत जाईल तसतसे उमेदवारांना फार मोठय़ा प्रमाणात अर्थार्जन प्राप्त होऊ शकते. एवढेच नव्हे तर प्रचंड मागणी असल्याने अगदी कमी वयात सामाजिक दर्जाबरोबरच फार मोठे आर्थिक बळ प्राप्त करू शकतो. मान्यवर संस्था : १) स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर नवी दिल्ली : येथे पाच वर्षांच्या बी. आर्च.बरोबरच चार वर्षांची बॅचलर ऑफ प्लॅनिंग ही पदवी दिली जाते. प्रवेशासाठी इंग्रजी, फिजिक्स, गणित, केमिस्ट्री या विषयात कमीत कमी ६०% गुण हवेत. यासाठी प्रवेश परीक्षा असते. सदरची जाहिरात मे-जूनमध्ये येते. पत्ता- स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, ४ ब्लॉक बी. आय. पी. इस्टेट, न्यू दिल्ली-०२. २) गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, गोवा युनिव्हर्सिटी, मिरामार, पणजी- ४०३००१ गोवा येथे बी. आर्च.साठी प्रवेश दिला जातो. ३) जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मुंबई : उमेदारास १२वीला इंग्रजी, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, या विषयात कमीतकमी ५०% गुण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ड्रॉईंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी वयोमर्यादा नसून प्रवेश मात्र प्रवेशपरीक्षा आणि मुलाखतीद्वारे दिला जातो. पत्ता : जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, डॉ. डी. एन. रोड, मुंबई-१. ४) कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, शिवाजी पेठ, कोल्हापूर : परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षेत फ्री हँड ड्रॉईंग, आर्ट अॅप्रिसियेएन, सामान्यज्ञान मुलाखतीद्वारे दिला जातो. ५) कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी न्यू शिवाजी पार्क, अकोला : १२वीला इंग्रजी, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, या विषयात कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी वयोमर्यादा नसून प्रवेश मात्र प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे दिला जातो. ६) बी. के. पी. सभाज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २०४३, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे : प्रवेश मात्र प्रवेश परीक्षा, सामान्य ज्ञान, मुलाखतीद्वारे दिला जातो. उमेदवाराला १२वीला फिजिक्स, केमिस्ट्री व गणित या विषयात कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे. ७) एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, श्रीमती मार्टिना रोड, बांद्रा (प.), मुंबई: येथे १२वी नंतर प्रवेश दिला जातो. ५०% गुण असणे आवश्यक आहे. ८) विश्वेश्वरैय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, नागपूर : उमेदवाराला १२वीला फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि इंजिनीयरिंग या विषयात कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे. ९) कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, ३०२ ए डेक्कन जिमखाना, पुणे : उमेदवाराला १२वी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित व इंग्रजी या विषयात कमीत कमी ४५% गुण असणे आवश्यक आहे. १०) कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, श्रीमती प्रेमलता चव्हाण पॉलिटेक्निक, कराड, जि. सातारा. १२वीला ५०% गुण आवश्यक आहेत. सदरचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वास्तुविशारद- ज्युनियर डिझायनर- ज्युनियर आर्किटेक्ट- सिनियर डिझायनर- सिनियर आर्किटेक्ट किंवा स्टुडिओ इनचार्ज ते चीफ आर्किटेक्ट अशा वरच्या श्रेणीत जाऊ शकतो. मात्र बहुतेक आर्किटेक्ट काही काळाच्या अनुभवानंतर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात. बी. आर्च.नंतर ज्यांना या क्षत्रात संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञानाची तपश्चर्या पार पाडायची आहे असे उमेदवार पुढे एम. आर्च, एम. टेक पदवी प्राप्त करू शकतात. असे अभ्यासक्रम आय. आय. टी. खरगपूर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, रुरकी, स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, नवी दिल्ली, विश्वेश्वरैय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, नागपूर येथे पूर्ण करता येतो. |


बुधवार, ३० सप्टेंबर २००९
No comments:
Post a Comment